Sat, Jan 25, 2020 07:50होमपेज › Kolhapur › गणेशोत्सव साध्या पद्धतीने करून पूरग्रस्तांना निधी देणार

गणेशोत्सव साध्या पद्धतीने करून पूरग्रस्तांना निधी देणार

Published On: Aug 26 2019 1:47AM | Last Updated: Aug 26 2019 1:47AM
कोल्हापूर : प्रतिनिधी 

पश्‍चिम महाराष्ट्रातील गणेशोत्सवाची 140 वर्षांची परंपरा लाभलेले मंडळ म्हणून शिवाजी पेठेतील तटाकडील तालीम मंडळाची ओळख आहे. यंदा निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करून अधिकाधिक निधी पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. यंदा सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असून कोणत्याही प्रकारची लोकवर्गणी मागण्यात येणार नसल्याचे मंडळाचे अध्यक्ष तथा प. म. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी जाहीर केले. 

पूरग्रस्तांच्या मदतीकरिता दै. ‘पुढारी’ने तालीम मंडळांना  केलेल्या साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत तटाकडील तालीम मंडळाने इतर मंडळांनीही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी यथाशक्‍ती योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तटाकडील तालमीच्या गणेशोत्सवातील अनंत चथुर्दशीची मिरवणूक लक्षवेधी असते. यंदा पुरामुळे हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. पूरग्रस्तांना अधिकाधिक मदतीसाठी सर्व कार्यकर्ते सक्रिय आहेत. यात सचिव एन. डी. जाधव, संचालक सरदार पाटील, राहुल पाटील, शहाजी शिंदे, अभिजित जाधव, प्रदीप पंडे, सागर जाधव, अमित जाधव, संदीप निकम, आकाश पाटील आदींचा समावेश आहे. 

पाटीदार युवक मंडळाचा सहभाग 

येथील श्री कोल्हापूर पाटीदार सनातन युवक मंडळातर्फे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविले जात आहेत. दै. ‘पुढारी’च्या आवाहनास प्रतिसाद देत मंडळाने गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

पूरग्रस्त आणि आपत्ती व्यवस्थापनाचे काम करणार्‍या संस्थांसाठी विविध प्रकारची मदत पाटीदार समाजाच्या युवक मंडळ, महिला व युवती मंडळातर्फे मदत करण्यात आली. गेले पंधरा दिवस पाटीदार समाजाचे सुमारे 250 ते 300 कार्यकर्ते मदतकार्यात सक्रिय सेवा देत आहेत. समाजाच्या शिरोली ग्रुपच्या वतीने पूरग्रस्त मुक्या जनावरांना पशुखाद्य स्वरूपात 50 पोत्यांचे वितरणही करण्यात आले. 
मंडळाचे अध्यक्ष हरेल पटेल, ईश्‍वर पटेल, उपाध्यक्ष महेश पटेल, सचिव भीखालाल पटेल, भावेश पटेल, शंकर पटेल, हरेश पटेल, गोविंद पटेल, वसंत पटेल, विनोद पटेल, मगन पटेल आदींनी मदतकार्यात सहभाग घेतला.