Mon, Apr 22, 2019 11:57होमपेज › Kolhapur › रात्रीत २९ दुकाने फोडली : गांधीनगर कडकडीत बंद

रात्रीत २९ दुकाने फोडली : गांधीनगर कडकडीत बंद

Published On: Jan 05 2018 1:12AM | Last Updated: Jan 05 2018 12:25AM

बुकमार्क करा
गांधीनगर : वार्ताहर

एका  रात्रीत येथील 29 दुकानांमध्ये झालेल्या चोरीच्या निषेधार्थ गांधीनगर बाजारपेठेत गुरुवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. सिंधी सेंट्रल पंचायतमध्ये झालेल्या व्यापार्‍यांच्या बैठकीत चोरट्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी  करण्यात आली. दरम्यान, आ. अमल महाडिक यांनी या चोरीचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे देण्याची सूचना केली.

गेल्या काही वर्षांपासून येथे चोरी व लुटमारीचे प्रकार वाढत आहेत. किरकोळ चोर्‍यांचे प्रकारही वाढीस लागले आहेत. पोलिसांकडून केवळ कच्ची नोंद घेतली जाते अन् त्याचा पाठपुरावा पोलिसांकडूनही होत नाही, अशा प्रतिक्रिया उमटल्या. यावेळी सिंधी सेंट्रल पंचायतीमध्ये अध्यक्ष भजनलाल डेंबडा, होलसेल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष ताराचंद वाधवाणी, सरपंच रितू लालवाणी, पंचायत समिती सदस्य सरिता कटेजा, सिंधी सेंट्रल पंचायतचे उपाध्यक्ष, अशोक टेहल्यानी, रमेश तनवाणी, गुवालदास कट्यार, भगतराम चावला, अशोक ठाकूर, मदनलाल मलानी, मनोज बचवाणी, नानक सुंदराणी, पूनम परमानंदानी, प्रताप चंदवाणी, किशनचंद वधवा, सोनी सेवलानी यांच्यासह रिटेल, होलसेल व्यापारी असोसिएशनचे सदस्य बैठकीला उपस्थित होते.

दरम्यान, सिंधु मार्केट, गुरुनानक मार्केट, झुलेलाल मार्केट, स्वस्तिक मार्केट, गांधीनगर मेन रोड, गजानन मार्केट, मोहिते मार्केट, छत्रपती शिवाजी मार्केटमधील सर्व दुकाने बंद राहिली. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट होता.

सीसीटीव्ही यंत्रणा उभारणार : महाडिक

दरोड्याची माहिती मिळताच आमदार अमल महाडिक, करवीर पंचायत समितीचे सभापती प्रदीप झांबरे, संजय गांधी निराधार समिती कोल्हापूर दक्षिणचे अध्यक्ष तानाजी पाटील, किरण घाटगे यांनी घटनास्थळी भेट दिली. आमदार फंडातून सीसीटीव्ही यंत्रणा बाजारपेठेत उभारण्यात येईल, अशी घोषणा आमदार अमल महाडिक यांनी केली. तर गडमुडशिंगीचे उपसरपंच तानाजी पाटील  यांनी गांधीनगरपैकी गडमुडशिंगीच्या हद्दीत दोन दिवसांत सीसीटीव्ही यंत्रणा उभारली जाईल, असे स्पष्ट केले.

कोट्यवधीची उलाढाल ठप्प

राज्य बंदमुळे बुधवारी गांधीनगर बंद राहिले. लगेच दुसर्‍या दिवशी गुरुवारी 29 दुकाने फोडल्याने त्याच्या निषेधार्थ बंद पाळण्यात आला. सलग दोन दिवस बंद पाळल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली.