Tue, Jul 16, 2019 23:53होमपेज › Kolhapur › इंटरनेटवरील गेम बेतताहेत जीवावर!

इंटरनेटवरील गेम बेतताहेत जीवावर!

Published On: Aug 27 2018 1:14AM | Last Updated: Aug 27 2018 12:54AMकोल्हापूर : राजेंद्रकुमार चौगले

एखाद्या कॉम्प्युटर अथवा मोबाईलच्या माध्यमातून इंटरनेट गेममुळे जीव घेतला जाऊ शकतो, ही कल्पना एखाद्या फिक्शनमध्ये अतिरंजित वाटली असली; तरी ही प्रत्यक्षात घडलेली एक घटना आहे. ‘मोमो चॅलेंज’ हा इंटरनेट गेम सध्या धुमाकूळ घालत आहे. त्याचा पहिला बळी राजस्थानमधील अजमेर येथील एका विद्यार्थिनीच्या रूपाने गेला असल्याने इंटरनेटवरील गेम जीवावर बेतत असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे.

सोशल मीडियाच्या जाळ्यात मुले

भीतीचं आणि दुःसाहसाचं आकर्षण असलेली मानसिकता, जिंकण्याची ईर्ष्या यातून व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकते, याचे हे वास्तव उदाहरण आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून या गेमच्या जाळ्यात मुलांना अडकवले जाते. चित्तथरारक, धाडसी गोष्टी करण्याची आव्हाने देणारा हा गेम आहे. या गेममध्ये प्रत्येक टप्प्यावर एकेक आव्हान दिले जाते आणि ते पूर्ण करताच हातावर एक खूण करायची असते. याचा शेवटचा टप्पा म्हणजे आत्महत्या करणे होय.

ऑनलाईनचा विळखा

ऑनलाईनच्या विळख्यात सापडत चाललेल्या मुलांकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. ‘पोकेमॉन गो’ या गेममध्ये पोकेमॉनला शोधण्यासाठी कुठेही भरकटणार्‍यांबाबत अपघाताच्या घटना घडल्या आहेत. ‘व्हॅम्पायर बॅटिंग’ हाही असाच एक भयंकर गेम. व्हॅम्पायरचा अर्थ एक कल्पित भूत जे मनुष्याचे रक्त पिते. या गेममध्ये खेळणारी व्यक्ती व्हॅम्पायरप्रमाणे वर्तन करेल, अशी रचना केलेली असते. ‘द कार सर्फिंग चॅलेंज’ या गेममध्ये कारच्या छतावर उभं राहून ड्राईव्ह करण्याचे आव्हान दिलं जाते. ‘द चोकिंग गेम’ या प्रकारात एक खेळाडू दुसर्‍या व्यक्तीचा गळा दाबतो.

 पालकांची जबाबदारी महत्त्वाची

कोणत्या काळात आपण जगतो आहोत, हेच कळेनासे झाले आहे. स्मार्टफोन, लॅपटॉप आल्याने व्यक्ती आपसुक शहाणी, विवेकी होत नसते. ते शहाणपण येण्यासाठी एक समज विकसित होण्याची नितांत आवश्यकता आहे. एखाद्या कॉम्प्युटर गेमने, मोबाईल गेमने जीव घेतला जाऊ शकतो, ही कल्पना एखाद्या फिक्शनमध्येही अतिरंजित वाटली असती; मात्र ते प्रत्यक्षात घडते आहे. त्यामुळे अशा सोशल माध्यमांवरील गेमपासून रोखण्यासाठी सर्वप्रथम पालकांनी सजग राहणे गरजेचे आहे.