कोल्हापूर : गौरव डोंगरे
माणूस आयुष्यभर शिकतच असतो, असे म्हणतात. उतारवयात नातवंडांत खेळणे, त्यांचा अभ्यास करून घेण्याच्या वयात मनोहर रामचंद्र चौगले यांनी कलाशाखेची पदवी प्राप्त केली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून त्यांनी ही पदवी मिळविली.
कौटुंबिक जबाबदारीमुळे मॅट्रिकनंतर शिक्षण बंद केले. आई, वडिलांची जबाबदारी होती. मिळेल ते काम करून कुटुंबाला हातभार लावला. दुधाच्या बाटल्या घरोघरी पोहोच करणे, मेडिकलमध्ये काम करणे, चहाचा गाडा चालविणे याद्वारे त्यांनी संसार उभा केला. यामुळे शिक्षणापासून दूर गेले. चित्रपटसृष्टीत काही छोट्या भूमिका, मेकअप म्हणून काम केले.
शिक्षणात 50 वर्षांचा खंड पडला. पण शिक्षणाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. मार्केट यार्डातील अर्बन बँकेच्या शाखेत सुरक्षा रक्षकाचे काम करत करत त्यांनी अभ्यास सुरूच ठेवला. दिवसभर अभ्यास आणि रात्रपाळीला काम असा त्यांचा दिनक्रम होता. पत्नी सीमा, मुलगा प्राण, गौतम, सुना सई व जुई यांची त्यांना साथ मिळाली. घरच्यांनीही त्यांच्या अभ्यासात खंड पडू दिलेला नाही.
परीक्षेपूर्वी अभ्यासाला मदत करणे. जागून अभ्यास करत असताना त्यांना वेळेवर चहा, नाष्टा देण्याचा कटाक्ष दोन्ही सुनांनी पाळला. त्यांनी राज्यशास्त्र विषयातून त्यांनी पदवी मिळविली.
शिकण्यासाठी वयाची मर्यादा नसते. परिस्थितीवर मात करण्याचे व संघर्ष करण्याचे बळही शिक्षणातूनच मिळाल्याचे ते आपल्या संपर्कातील युवकांना सांगून नेहमी प्रेरणा देण्याचे काम करत असतात. ते काम करत असलेल्या बँकेसह अनेक संस्थांनीही त्यांचा सत्कार करून कौतुकाची थाप दिली. सध्या त्यांनी योग प्रशिक्षण घेत असून परिसरातील नागरिकांसाठी योगाचे धडे देण्याचा मानस बोलून दाखवला. तसेच पुढील काळात त्यांनी कायद्याचे शिक्षण घेण्याचे ठरविले आहे.