Tue, Apr 23, 2019 13:34होमपेज › Kolhapur › गडहिंग्लज काळभैरव मंदिरात दागिने, प्रभावळ, रोकडसह 3 लाखांची चोरी

गडहिंग्लज काळभैरव मंदिरात दागिने, प्रभावळ, रोकडसह 3 लाखांची चोरी

Published On: Feb 24 2018 1:14AM | Last Updated: Feb 24 2018 1:14AMगडहिंग्लज : प्रतिनिधी

महाराष्ट्र-कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या काळभैरव मंदिरात गुरुवारी मध्यरात्री दागिने, प्रभावळ यासह दानपेटी फोडून तीन लाखांहून अधिक रकमेची लूट करण्यात आली. मंदिरातील सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाले असून तोंडाला मास्क, हातमोजे घालून चोरी केल्याने चोरटे सराईत असल्याचे समोर आले आहे. या धाडसी चोरीमुळे जिल्ह्यासह सीमाभागात खळबळ उडाली असून भाविकांतून तीव्र संताप व्यक्‍त होत आहे.

गडहिंग्लज शहरापासून पाच कि. मी. अंतरावर बड्याचीवाडी गावच्या हद्दीतील डोंगरात महाराष्ट्राच्या सीमेवर काळभैरवाचे मंदिर वसले आहे. महाराष्ट्र, कर्नाटकासह गोवा येथून लाखो भाविक या ठिकाणी येत असतात.

दोन फेबु्रवारी रोजी काळभैरवाची वार्षिक यात्रा पार पडली होती. गुरुवारी मध्यरात्री 1.30 च्या सुमारास तीन चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून या ठिकाणी असलेली दानपेटी, प्रभावळीमधील तीन किलो चांदी, काळभैरवाच्या हातातील चांदीची तलवार, जोगेश्‍वरी देवीच्या गळ्यातील चांदी व सोन्याचे दागिने, चांदीचा त्रिशूळ, राजदंड व चांदीची छडी असा किमती ऐवज लुटला.

सीसीटीव्हीमध्ये हे तिन्ही चोरटे कैद झाले असून, दोन चोरटे चोरी करीत असताना तिसर्‍याने त्याच ठिकाणी असलेला नारळ सोलण्याचा कोयता हातात घेऊन कोणी येते का, याची पाहणी करत राखणदाराचे काम केले. चोरट्यांनी मास्क घातल्याने यामध्ये नेमके चेहरे स्पष्टपणे दिसून येत नाहीत. 

श्ाुक्रवारी सकाळी पुजारी संजय गुरव हे पहाटेची पूजा करण्यासाठी गेले असता, त्यांना मंदिराचे दार उघडल्याचे लक्षात आले. पुढे जाऊन पाहिल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनीही कोल्हापूरहून श्‍वानपथक व ठसेतज्ज्ञांना बोलावले. चोरीची माहिती पंचक्रोशीत समजताच मंदिर परिसरात भाविकांनी एकच गर्दी केली होती. पोलिस तपासात चोरट्यांनी दानपेटी मंदिराच्या वरच्या बाजूला नेऊन फोडल्याचे आढळून आले.

चोरट्यांनी हातमोजे घातल्याने पोलिसांना बोटांचे ठसे मिळाले नाहीत. श्‍वानपथकाने माग काढला असता, चोरटे कर्नाटकच्या दिशेने गेल्याचे स्पष्ट झाले आहे. मंदिर आणि परिसराची पूर्ण माहिती घेऊनच ही चोरी केली असावी. प्रभावळ काढण्यासाठी चोरट्यांनी येतानाच स्कू्र ड्रायव्हर आणला होता.

दरम्यान, गडहिंग्लज आणि परिसरात गेल्या महिनाभरात चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यातच लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या काळभैरव मंदिरातील चोरीमुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्‍त होत आहे.

प्रभावळ अर्धीच निघाली
काळभैरव मंदिरामध्ये मूर्तीच्या मागे संपूर्ण प्रभावळ चांदीची असून अंदाजे 10 ते 12 किलोपेक्षा अधिक वजनाची ही प्रभावळ आहे. चोरट्यांनी ती काढण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रभावळीचे काम चांगले असल्याने ती संपूर्ण प्रभावळ चोरट्यांना निघाली नाही. यामुळे निघेल तेवढीच प्रभावळ काढून चोरट्यांनी पोबारा केला आहे.

रेकी करूनच चोरी...
चोरट्यांनी काळभैरव मंदिरात डल्‍ला मारण्यापूर्वी या मंदिर परिसराची संपूर्ण रेकी करूनच मग चोरी केल्याचे आढळून येते. या ठिकाणी पहाटेच्या वेळी लोकांची ये-जा असते. रात्री उशिराही काही भाविक या परिसरात असतात. यामुळे चोरीसाठी त्यांनी मध्यरात्रीची वेळ निवडून घाईगडबडीत जेवढे लुटता येईल, तेवढे लुटले आहे. मंदिरात सीसीटीव्ही असल्याचे त्यांना माहीत असल्याने त्यांनी मंदिरात येण्यापूर्वीच तोंडावर मास्क लावला होता.