Sun, Jul 21, 2019 16:55
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › गडहिंग्लजला मटका बुकीच्या घरावर छापा

गडहिंग्लजला मटका बुकीच्या घरावर छापा

Published On: Jun 16 2018 1:29AM | Last Updated: Jun 16 2018 12:30AMगडहिंग्लज : प्रतिनिधी

येथील मटका बुकी मुरलीधर नागेश  कांबळे  याच्या कडगाव रोडवरील शारदा निवास या घरावर कोल्हापूर विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी छापा टाकून कारवाई केली. मटका बुकी कांबळे याच्या घरावर छापा टाकण्याची ही पहिलीच वेळ असून यामधूनही कांबळे हा फरार झाला आहे. तालुक्यातील विविध ठिकाणांहून येणार्‍या मटक्याच्या चिठ्ठ्या एकत्रित करताना त्याच्याकडे काम करणार्‍या सातजणांना याप्रकरणी अटक केली आहे. 

सायंकाळी पाचच्या सुमारास विशेष पथकातील पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत पाटील, कर्मचारी नीलेश उन्हाळे, संजय इंगवले, दिग्विजय चौगुले, रोहित पवार, रविराज लंबे, सद्दाम फकीर यांच्या पथकाने कांबळे याच्या घरावर छापा टाकला. यामध्ये नितीन दत्ता मोहिते (वय 35, देवगोंडा अपार्टमेंट, गडहिंग्लज), प्रकाश ईश्‍वर कांबळे (32, रा. अत्याळ), आकाश राजू इंजल (24, रा. मार्केट यार्ड), प्रशांत प्रकाश पाटील (27, रा. भीमनगर गडहिंग्लज), तुकाराम काशीनाथ कांबळे (25, दुंडगे), इकबाल मोहिद्दीन मुल्‍ला (34, मांगलेवाडी), नेताजी अण्णा माने (43, रा. संकेश्‍वर, ता. हुक्केरी) यांचा ताब्यात घेतलेल्यांमध्ये समावेश आहे. बुकीमालक मुरलीधर कांबळे हा फरारी झाला.

छाप्यात तीन मोटारसायकली (एम.एच. 09 सी 8291, केए 23 वाय 7233, एम.एच. 09 सीएच 5180) जप्त केल्या असून दहा कॅल्क्युलेटर, 11 मोबाईल संच, 4 स्टॅलपर व रोख 9,266 रुपये ताब्यात घेतले आहे. छाप्यानंतर गडहिंग्लजचे पोलिस निरीक्षक विपीन हसबनीस व उपनिरीक्षक कुरणे यांच्याकडे या आरोपींना पुढील कारवाईसाठी ताब्यात दिले. दरम्यान, कांबळे याच्या घरी छापा पडल्याने शहरात खळबळ उडाली होती. गडहिंग्लजमध्ये येऊन कोल्हापूरच्या पोलिसांच्या पोलिस पथकाने कारवाई केली, तरीही बुकीमालक मुरलीधर कांबळे मात्र या छाप्यामध्येही ‘नेहमीप्रमाणे’ फरारी झाल्याची चर्चा दिसत होती.