Mon, Jun 24, 2019 17:04होमपेज › Kolhapur › जीएसटी नव्हे, गब्बर सिंग टॅक्स

जीएसटी नव्हे, गब्बर सिंग टॅक्स

Published On: Dec 02 2017 1:08AM | Last Updated: Dec 02 2017 12:12AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

एक देश, एक कर लागू करण्यासाठी आम्ही जीएसटी आणला; पण या सरकारने या जीएसटीमध्ये इतके बदल केले की देशातील एकही विभाग या टॅक्सबद्दल चांगले बोलत नाही. अधिकार्‍यांना टॅक्स कसा लागू करायचा समजत नाही. चार्टर्ड अकाऊंटंटही बुचकळ्यात पडत आहेत. हा जीएसटी नव्हे, तर गब्बर सिंग टॅक्स आहे. या टॅक्सविरोधात रस्त्यावर उतरा. त्यामध्ये काँग्रेस अग्रभागी राहील. लोकसभा व विधानसभेतही आवाज उठवला जाईल, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्‍त केले. खा. चव्हाण यांनी येथील व्यापारी-उद्योजक यांच्याशी संवाद साधला. 

उद्योगासंबंधीचे जे प्रश्‍न आहेत, त्या प्रश्‍नांतून मार्ग निघू शकतो. त्यासाठी सरकारची इच्छाशक्‍ती लागते; पण भाजप-शिवसेना युती सरकारने या प्रश्‍नांकडे गांभीर्याने पाहिलेले नाही, निर्णय घेतले नाहीत. त्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. आमचे सरकार असते तर उद्योग-व्यापारासंबंधीच्या प्रश्‍नांवर 1 दिवसात निर्णय घेऊन प्रश्‍न निकाली काढले असते, असा टोलाही त्यांनी लगावला.

व्यापारी म्हणजे चोर आहेत का?

जीएसटीमध्ये बदल करून 37 प्रकारचे रिटर्नस् व्यापार्‍यांना भरावे लागत आहेत. यातून जे व्यापारी, उद्योजक कर भरणार नाहीत, त्यांना दंडात्मक कारवाई लागू करण्यात आली. म्हणजे उद्योजक-व्यापारी हे काही चोर आहेत का, असा सवाल त्यांनी केला. 

यापूर्वी अन्‍न धान्यापासून अनेक जीवनावश्यक वस्तू कर नव्हता. पण नव्या जीएसटीमध्ये जीवनावश्यक वस्तूचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे छोटे व्यापारी अडचणीत आले आहे. देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात डिझेल, पेट्रोलवर 30 ते 40 टक्के जादा टॅक्स आहे. त्यामुळे प्रश्‍न गंभीर बनत चालला असून यासंदर्भात लवकरच जीएसटी कौन्सिलसमोर हे प्रश्‍न मांडले जातील, असे त्यांनी सांगितले.

15 डिसेंबरपर्यंत राज्यातील रस्ते खड्डे मुक्‍त होणार का?

राज्यातील रस्त्यावरील खड्डे 15 डिसेंबरपर्यंत बुजवण्यात येतील, असे आश्‍वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील दिले आहे; पण राज्यातील रस्त्यांची परिस्थिती पाहिली असता हे काम पूर्ण होणार का, असा सवाल त्यांनी केला. 

‘कर लो दुनिया मुठी मे’

एकेकाळी महाराष्ट्र हे उद्योग धंद्याच्या बाबतीत देशातील आघाडीचे राज्य म्हणून ओळखले जात होते. पण गेल्या तीन वर्षांत उद्योजकांचे तुंबलेले प्रश्‍न पाहता या सरकारकडे विकासाचा द‍ृष्टिकोणच नाही, असे दिसत. फक्‍त ‘कर लो दुनिया मुठी मे’ असाच प्रकार राज्यात आणि देशात सुरू आहे. 

महामार्ग पोलिसांचे काम काय?

वाहनांवर ओव्हरलोड माल भरला जाऊ नये, याची तपासणी करण्यासाठी महामार्ग पोलिस आहेत. पण मूळ प्रश्‍न बाजूला सोडून महामार्ग पोलिस वाहनधारकांना प्रचंड त्रास देत आहेत, वाहनधारकांकडून किरकोळ कारणासाठी भरमसाठ पैसे मागतात. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून हा प्रश्‍न सोडवला पाहिले, असे खा. चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आ. पतंगराव कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी.एन.पाटील आदी उपस्थित होते. स्वागत चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले. प्रास्ताविक चेंबरचे ज्येष्ठ संचालक आनंद माने यांनी केले. आभार आ. सतेज पाटील यांनी मानले. कार्यक्रमास चेंबरचे उपाध्यक्ष संजय शेट्टे, स्मॅकचे राजू पाटील, सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल, स्मॅकचे गोरख माळी, हॉटेल मालक संघाचे अरुण चोपदार यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.  

सरकारच्या कारभाराचा विधिमंडळात जाब विचारू

राज्य सरकार सर्वच पातळींवर अपयशी ठरले आहे. त्यांच्या नाकर्तेपणाचा सर्वाधिक फटका शेतकर्‍यांना बसत आहे. सरकारविरोधात तीव्र नाराजी आहे. जनतेपुढे जाण्याची भाजपात हिम्मत नाही. यामुळे विरोधातील आवाज दाबण्याचाच प्रयत्न सुरू आहे, असा आरोप करत सरकारच्या कारभाराचा विधिमंडळ अधिवेशनात जाब विचारू, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी सांगितले.

परप्रांतीयांबाबत भाजपला उशिरा शहाणपण सूचले, असा टोलाही त्यांनी लगावला. सरकार खरेदी केंद्रे सुरू करणार होते, ती कुठे आहेत, असा सवाल करत चव्हाण म्हणाले, सरकारही शेतीमाल खरेदी करत नाही आणि व्यापारीही करत नाहीत. त्यात ऑनलाईन खरेदी सुरू केली आहे. त्यात गोंधळ सुरू आहे. त्याचाही भुर्दंड शेतकर्‍यांवरच पडत आहे. हे सरकारच ऑफलाईन झाले आहे. खोट्या जाहिराती आणि त्याही जनतेच्या पैशातून सुरू आहेत. 300 कोटी रुपये सोशल मीडियाच्या जाहिरातीसाठी खर्च केले हे कोणाचे पैसे होते? जनतेच्या पैशातूनच निवडणूक लढवण्याचा प्रयत्न भाजपचा सुरू आहे. हीच रक्‍कम कर्जमाफीसाठी दिली असती तरी आणखी शेतकर्‍यांना लाभ झाला असता.

सरकारने केलेली कर्जमाफी फसवी असून केवळ 3 ते 4 हजार कोटींचीच कर्जमाफी झाली असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. गुजरातच्या निवडणुकीत भाजपने काँग्रेसची धास्ती घेतली आहे. यामुळेच पंतप्रधानांना 50 सभा घ्याव्या लागत आहेत, भाजपच्या अनेक राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री गुजरातेत तळ ठोकून आहेत, असे सांगत चव्हाण म्हणाले, देशातील पोटनिवडणुकीत भाजपविरोधात निकाल लागले. राज्यात महापालिका, नगरपालिका अगदी ग्रामपंचायतीत काँग्रेसला यश मिळाले. निवडणका केव्हाही होतील, असे सांगत काँग्रेस तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पोलिस कोठडीत मृत्यू होत आहेत. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी ठोस काही कारवाई झालेली नाही. 

न्यायालयाचे आदेश असतानाही तपासी अधिकार्‍यांच्या बदल्या होतात, सरकारची ही सर्व भूमिका संशयास्पद आहे, असे सांगत दि.12 रोजी काँग्रेस-राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्षांचा सामूहिक मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यात काँग्रेसचे नेते गुलाब नबी आझाद सहभागी होतील. या मोर्चात सहभागी होण्यासाठी राहुल गांधी यांना विनंती केली असल्याचेही त्यांनी सांगितले. काँग्रेस कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, काँग्रेसला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप करत चव्हाण म्हणाले, काँग्रेस असला प्रकारांना घाबरणार नाही.

काँग्रेसची भूमिका नेहमीच राज्यघटनेला मानणारी आहे. भारतीय म्हणून कोणाला कोठेही जाण्याचा, राहण्याचा अधिकार आहे. तशीच मनसेचीही वेगळी भूमिका असू शकते. पण मुद्द्याची लढाई गुद्द्यावर नेण्याची मनसेची भूमिका चुकीची आहे. काँग्रेस कार्यालयाच्या तोडफोडप्रकरणी पोलिसांनी कारवाई करावी, झालेले नुकसान मनसेकडून भरून घ्यावे, असेही चव्हाण यांनी सांगितले. नारायण राणे यांच्याबाबत विचारता त्यांनी आपल्या त्यांना शुभेच्छा आहेत, असे सांगत अधिक भाष्य करण्याचे टाळले. यावेळी माजीमंत्री आ. पंतगराव कदम, सतेज पाटील, जिल्हाध्यक्ष पी.एन.पाटील उपस्थित होते.

रस्ते तरी खरे दाखवायचे होते : चव्हाण

सरकार खोट्या जाहिराती करत आहे. जाहिरातीतील लाभार्थ्यांना तरी खरा लाभ झाला की नाही, हे सांगता येत नाही. डिसेंबरपूर्वीच काही रस्ते गुळगुळीत झाले म्हणून जाहिरात येऊन गेली, त्यातील रस्ते हे हाँगकाँग, बँकाँकमधील होते. किमान रस्ते तरी राज्यातले दाखवायचे होते, असा टोला लगावत रस्ते किती गुळगुळीत झाले याचे उत्तर तुमच्या जिल्ह्यातच मिळेल, असेही सांगत नाव न घेता सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली.