Thu, May 23, 2019 20:25
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › ’जीएसटी‘ कोल्हापूर परिक्षेत्रीय कार्यालयास ‘आयएसओ 9001’

’जीएसटी‘ कोल्हापूर परिक्षेत्रीय कार्यालयास ‘आयएसओ 9001’

Published On: Jul 16 2018 1:24AM | Last Updated: Jul 15 2018 10:48PMकोल्हापूर : डी. बी. चव्हाण

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) या शासनाच्या विभागातील कोल्हापूर परिक्षेत्रीय कार्यालयास नुकतेच आयएसओ 9001-2015 हे प्रमाणपत्र प्राप्‍त झाले आहे. याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील 11 विभागीय कार्यालयांनाही हे प्रमाणपत्र प्राप्‍त झाली आहेत. 

कर जमा करणार्‍या शासकीय खात्यांपैकी प्रमाणपत्र मिळालेले जीएसटीचे हे राज्यातील पहिले कार्यालय आहे. करदाते, कर सल्‍लागार आणि खात्यातील अधिकारी, कर्मचारी यांनी समन्वयातून केलेल्या कामाची ही पोचपावती आहे. या प्रमाणपत्रामुळे कामाची जबाबदारी वाढली असून, करदात्यांना दर्जेदार सुविधा देण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती वस्तू व सेवाकर विभाग कोल्हापूर परिक्षेत्राचे अप्पर आयुक्‍त सी. एम. कांबळे यांनी दिली. 

कोल्हापूर परिक्षेत्रात आठ जिल्ह्यांचा समावेश आहे. जीएसटी कार्यालय म्हणजे करदाते, कर सल्‍लागार आणि कार्यालयातील अधिकारी एवढाच त्याचा परिघ. पण, हिशेबाच्या फायलींचे ढीग, त्याच्यामध्ये काम करणारा निरीक्षक, यातून कामे कधी होणार, असा प्रश्‍न करदाते  व कर सल्‍लागारांना पडल्याशिवाय राहत नव्हता. या सर्वामधून सुटका होण्यासाठी व करदाते, कर सल्‍लागार यांचे दर्जेदार सेवा आणि जलद काम पूर्ण व्हावे, यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालीन सहआयुक्‍त विलास इंदलकर यांनी 2014 पासून कार्यसंस्कृती सुधारणाची प्रक्रिया सुरू केली.  

कामाच्या निपटार्‍यासाठी वर्षात पूर्ण करावयाचे काम महिन्यात आणि महिन्यात पूर्ण करावयाचे काम सप्‍ताहात पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले. यातून महसुलात वाढ झाली. नोव्हेंबर 2016 मध्ये 600 अधिकार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले. तर एप्रिल 2017 मध्ये जीएसटीचे प्रशिक्षण देण्यात आले. यानंतर कामाचा निपटारा करण्याबाबत कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी कामाला लागले. दररोज येणारी व प्रलंबित कामे याची तातडीने पूर्तता करणे सुरू झाले. यातून अधिकारी आणि कर्मचार्‍यांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण झाला. त्यानंतर आयएसओ मिळण्याबाबत अधिकार्‍यांच्या बैठकीत चर्चा झाली.

  कांबळे म्हणाले,  कामातील क्‍लिष्टता, करदात्यांकडून सादर करण्यात येणार्‍या प्रस्तावांमध्ये त्रुटी यामुळे कामाची पूर्तता करत असताना वेळ जातो, कायदे आणि नियम लक्षात घेऊन कामाची कार्यपद्धती ठरविण्यात आली. याशिवाय प्रत्येक उपायुक्‍त कार्यालयाचा मानांकनासाठी स्वतंत्र विचार करण्याचा निर्णय झाला.  पायाभूत सुविधा, कार्यालयात माहितीचे फलक लावणे, कागदपत्रे आणि अभिलेख, मानवी संसाधने, दर्जा व्यवस्थापन पद्धती या मुद्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. 

भौतिक सुविधा, रेकॉर्ड अद्ययावत ठेवणे, कार्यालयात येणार्‍या अभ्यागतांना अंतर्गत कार्यालयाची माहिती देणे या बाबी सुरू केल्या. त्यामुळे करदात्यातून समाधान व्यक्‍त केले जाऊ लागले. या सर्व सेवामुळे हे कार्यालय आयएसओ 9001चे प्रमाणपत्र मिळण्यास पात्र ठरले.

अधिकारी व कर्मचार्‍यांचे यश

कोल्हापूर परिक्षेत्रीय कार्यालयाबरोबर उपायुक्‍त दर्जाच्या जिल्ह्यातील 11 कार्यालयांनाही ‘आयएसओ 9001- 2015’ हे प्रमाणपत्र मिळाले आहे. सांगली आणि सातारा या जिल्ह्यांतही जीएसटी कार्यालयांचे काम अत्यंत चांगले आहे. पण, या दोन जिल्ह्यांत नवीन कार्यालयासाठी इमारती उभारण्यात आल्या आहेत. त्यांचे उद्घाटन होणे बाकी आहे. पण, कर गोळा करणार्‍या राज्यातील कोणत्याही कार्यालयास आयएसओ मिळालेले नाही. कोल्हापूर परिक्षेत्र कार्यालयाने मात्र हे प्रमाणपत्र प्राप्‍त केले आहे. अधिकारी व कर्मचारी यांचे यामध्ये मोठे यश आहे, असे कांबळे यांनी सांगितले.