होमपेज › Kolhapur › अनुभवासारखा दुसरा गुरू नाही : प्रताप पाटील

अनुभवासारखा दुसरा गुरू नाही : प्रताप पाटील

Published On: May 07 2018 2:02AM | Last Updated: May 07 2018 1:17AMकोल्हापूर : प्रतिनिधी

अनुभवासारखा दुसरा गुरू नाही, म्हणून प्रत्येक क्षेत्रातील अनुभवाचा संचय करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष प्रताप पाटील यांनी केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठ संचलित पत्रकार ग. गो. जाधव चॅरिटेबल ट्रस्टच्या वृत्तपत्रविद्या पदवी व पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुक्‍त विद्यापीठाचे कोल्हापूर विभागप्रमुख प्रा. दादासाहेब मोरे होते.

माध्यमांमध्ये बरीच प्रगती होत असल्याने ज्ञान मिळवण्याबरोबरच लोकांचा वेळही वाचत असल्याचे सांगून पाटील म्हणाले, लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी पत्रकारांच्या अंगी अनुभवाची शिदोरी हवी. विद्यापीठातील पदवी आणि पदवीकामधील ज्ञानाचा विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वासाठी वापर करावा व नाव कमवावे. मुक्‍त विद्यापीठाचे विद्यार्थी हे इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत अनुभवाची शिदोरी घेऊन घडत असतो. तसेच ‘लिखित माहिती, अनुभव व निरीक्षण करणे म्हणजेच ज्ञान मिळवणे होय. याचा पत्रकारितेत प्रत्येकाने वापर करायला हवा. 

दै. ‘पुढारी’ने गेल्या 80 वर्षांत फक्‍त छपाई माध्यमापुरते मर्यादित न राहता रेडिओ, वेब आणि ट्रस्टच्या माध्यमातून अनुभवाच्या जोरावर सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. उत्तुंग भरारी घेतली आहे. प्रत्येकाने आपल्या घेतलेल्या अनुभवरूपी शिक्षणाची नाळ तशीच जोडलेली ठेवून पत्रकारिता करायला हवी. सहकाराच्या क्षेत्रात याला खूप संधी आहेत, असे पाटील म्हणाले.

दीपप्रज्वलनानंतर अभ्यासकेंद्राचेे प्रमुख  अ‍ॅड. वसंत सप्रे यांनी प्रास्ताविकात केंद्राची व अभ्यासक्रमाची माहिती दिली. तर अ‍ॅड. मेघा ठोंबरे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी शहाजी लॉ कॉलेजचे प्राचार्य नारायणन, केंद्राचे समंत्रक राजेंद्र मांडवकर, प्रा. शिवाजी जाधव, मारुती पाटील, महादेव बन्ने व पदवी- पदविकेचे विद्यार्थी उपस्थित होते. आभार प्रा. प्रशांत जाधव यांनी मानले.