Thu, Apr 25, 2019 06:07होमपेज › Kolhapur › काजू बीच्या दरावरच कारखानदारांचे भवितव्य

काजू बीच्या दरावरच कारखानदारांचे भवितव्य

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

ऐनापूर : वार्ताहर

गडहिंग्लज, आजरा, चंदगड व कोकण विभागात यंदा काजूची झाडे चांगलीच मोहरली होती. मात्र, मध्यंतरी पडलेल्या धुक्याने मोहर गळून गेल्याने या हंगामातही काजू उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्‍त होत आहे. परिणामी, यंदा कच्च्या काजू बीच्या दरावरच कारखानदारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. असे असले तरी महागड्या दराने काजू बियांची खरेदी करणे कारखानदारांच्या अडचणीत भर टाकणारे ठरणार आहे.

या तिन्ही तालुक्यांसह कोकण व बेळगाव भागात काजूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यंदा मुळातच काजूचे उत्पादन उशिराने झाले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात झाडे चांगली बहरात असल्याचे चित्र होते. मात्र, गेल्या महिनाभरात धुक्याच्या जोरदार मार्‍याने मोहर गळून गेला असून परिणामी उत्पादक अन् खरेदीदार संकटात सापडला आहे. यंदाही उत्पादनात घटीची भीती जाणकारांकडून व्यक्‍त केली जात आहे. यावर्षीही काजू उत्पादनात घट झाल्यास व्यवसाय चालविणे जिकिरीचे बनणार आहे. 

सद्यःस्थितीला कोकणातील राजापूर 158 ते 160 रुपये, लांजा 150 ते 155 दराने विक्री होत आहे. दरवर्षीच्या तुलनेने चालूवर्षी बाजारामध्ये कमी प्रमाणात काजू बी उपलब्ध होईल, अशी स्थिती आहे. सध्याच्या चालू भावाप्रमाणे कोकणची कच्ची बी खरेदी करून वाळवणी केल्यानंतर सहा ते सात टक्के प्रमाणे तूट येत असून हा भाव साधारणतः 170 च्या आसपास पोहोचत आहे. या दरामध्ये सध्याच्या स्थितीचा तयार मालाचा भाव पाहता कारखानदारांना तोट्यात जाण्यासारखेच आहे. त्यामुळे सद्यस्थितीत चढ्या दराने काजू बी खरेदी करणे आर्थिकद‍ृष्ट्या परवडणारे नाही. 

उशिरा आलेल्या पिकामुळे यंदा गडहिंग्लज, आजरा, चंदगडसह बेळगाव परिसरात कच्च्या बियांची आवक झालेली दिसत नाही. मुळातच काजू प्रक्रिया उद्योगासाठी लागणार्‍या मशिनरी, कच्चा माल, इमारत, माल साठवणुकीसाठी लागणारे गोडावून याकरिता उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात कर्जे काढून व्यवसाय सुरू केले आहेत. त्यामुळे उद्योग टिकविण्यासाठी उद्योजकांना चढ्या दराने खरेदी करण्याशिवाय पर्यायच राहत नसल्याचे चित्र दिसत आहे.

गेल्यावर्षीही कच्च्या बियांचा खरेदी दर 160 च्या पुढे गेल्याने छोट्या कारखान्यांच्या चिमण्या पेटल्याच नाहीत. तर मोठ्या कारखान्यांमध्ये 50 ते 60 टक्केच काम सुरू ठेवले होते. यामुळे अनेक कामगारांवर बेरोजगारीची संक्रांत ओढवली. काजू उद्योगाच्या माध्यमातून युवक, महिलांना रोजगार उपलब्धी होत असून उत्पादनातील घट व परिणामी वाढत्या दराने सगळेच हवालदिल झाले आहेत. एकंदरीत सद्यस्थितीला हा व्यवसाय करणे तोट्याचे दिसत असल्याचे उद्योजकांकडून सांगण्यात येत आहे.

शेतकरी - कारखानदारांचे भवितव्य व्यापार्‍यांच्या हाती
 

शेतकर्‍यांनी उत्पादित केलेला  काजू व्यापार्‍यांकडून खरेदी केला जातो. यावेळी व्यापारी सांगेल त्या दराला शेतकर्‍याला तो द्यावा लागतो. कच्चा माल व्यापार्‍यांकडून कारखानदार खरेदी करतात. यावेळी व्यापारी लावेल त्या दरानेच खरेदी करावी लागते. काजूवर प्रक्रिया केल्यानंतर तयार झालेला काजू कारखानदारांकडून व्यापार्‍यांना विकला जातो. यावेळीही व्यापारी ठरवेल त्या दराने तयार माल द्यावा लागतो. एकूणच शेतकरी व कारखानदार यांची अवस्था एकसारखीच असून या दोघांच्याही दोर्‍या व्यापार्‍यांच्या हाती असल्याचे चित्र आहे.

समन्वयाची गरज

काजू उद्योग टिकवून ठेवण्यासाठी काजू उत्पादक शेतकरी, व्यापारी व कारखानदार यांच्यात समन्वयाची गरज विशद होत आहे. ऊस उत्पादनामध्ये शासन, साखर कारखानदार व शेतकरी यांच्यातील समन्वयाने भाव ठरवला जातो. मात्र, काजू उद्योग याला अपवादच ठरला आहे. अनेकदा बडे व्यापारी व कारखानदार चढ्या भावाने कच्चा माल खरेदी करत असल्याने छोटे उद्योजक तोट्याच्या गाळात रूतत चालले आहेत. त्यामुळे सर्वांमध्ये समन्वय राखणे गरजेचे बनले आहे.

Tags : Kolhapur, Kolhapur News, Future, factory, rate, cashew seed


  •