Sun, May 26, 2019 09:37होमपेज › Kolhapur › फळभाज्या ढिगावर विकण्याची वेळ

फळभाज्या ढिगावर विकण्याची वेळ

Published On: Apr 18 2018 1:42AM | Last Updated: Apr 17 2018 11:17PMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोबी, फ्लॉवर नगाला 5 ते 10 रुपये, वांगी, भेंडी, कारली, दोडका, ढबू, मिरची, काकडी, टॉमेटो 10 ला ढीग हे दर आहेत. रोजच्या ताटात येणार्‍या फळभाज्यांचे दर पाहून ग्राहकाला ऐन उन्हाळ्यात सुखद गारवा वाटत असलातरी याच कडक उन्हाच्या झळा सोसून पिकवलेल्या शेतमालाला बाजारातही कवडीमोलाचाही दर राहिला नसल्याने शेतकरी मात्र रडकुंडीच्या घाईला आला आहे. आठवडी बाजारात किलोवर विकला जाणार्‍या फळभाज्या ढिगावर विकण्याची वेळ आली आहे. पीक वाढवण्यासाठी गाळलेल्या घामाचे तरी मूल्य निघावे एवढी भाबडी आशा देखील पूर्ण होताना दिसत नाही. 

साधारणपणे एप्रिलच्या कडाक्याच्या उन्हात भाजीपाला पिकवणे ही शेतकर्‍यांची सहनशीलतेची आणि कष्टाची कठोर परीक्षाच असते. तरीही जूनमध्ये खरीपाच्या तयारीसाठी हातात चार पैसे यावेत म्हणून उन्हातान्हाची पर्वा न करता शेतकरी फळभाज्याची लागवड करतो. या दिवसात आवकही कमी होत असल्याने दरही चांगला मिळतो हा त्यामागचा अंदाज असतो; पण यावर्षी हे सर्व अंदाज धुळीस मिळाले आहेत. भाजीपाल्याची आवक प्रचंड वाढल्याने दरातही मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात बाजारात भाजीपाल्याची स्वस्ताई दिसत आहे. 

या दिवसात कोथिंबिरीसह मेथी, पोकळा, पालक, शेपू, अंबाडी या पालेभाज्या पिकवण्यासाठी आच्छादनासह पाण्याचे सुयोग्य नियोजन करावे लागते. त्यासाठी खतमात्राही जपून वापरावी लागते  वांगी, टोमॅटो, कोबी, फ्लावर, भेंडी, कारली, काकडी, ढबू, दोडका ही पिके देखील नाजूक असल्याने त्यांना पाणी व खतासह औषध फवारणीचे काटेकोर वेळापत्रक पाळावे लागते. त्यातच कडक ऊन आणि वादळी पाऊस, धुके  सतत बदलणार्‍या वातावरणाला जुळवून घेण्यासाठीही वेगळ्या फवारण्यांचा खर्च करावा लागतो. 

एवढे करून बाजारात माल नेण्यासाठी वाहतुकीचा खर्चही पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे दीड पटीने वाढला आहे. बाजारात माल पोहोचल्यावर घेवारीही दर पाडतात, अखेर दिवसभर उन्हातच बसून स्वत:च विकत बसून विकले तरी हातात राहणारी शिल्‍लक पाहिली तर केलेला खर्चही निघत नाही अशी परिस्थिती आहे. बाजारातील या दर पाडण्याच्या व्यवस्थेमुळे शेतकरी अक्षरशा मेटाकुटीला आला आहे. 

कलिंगड विक्रीतून वाहतूक खर्च निघेना 

कलिंगड पिकवणार्‍या शेतकर्‍यांची अवस्था तर भीक नको पण कुत्रे आवर अशी झाली आहे. या दिवसात कलिंगडाची मागणी व दर वाढत असल्याने काळ्या कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. बाजारात कलिंगडाचे ढीग साचून राहिले आहेत. साहजिकच दर पडल्याने 10 ते 20 रुपयांना एक याप्रमाणे विकून कसाबसा वाहतूक खर्च काढण्यात शेतकरी प्राधान्य देत आहेत; पण तोही निघत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. 

 

Tags : kolhapur, kolhapur news, Fruit, vegetables, Rate,