Sun, Oct 20, 2019 11:47होमपेज › Kolhapur › फळे पिकविण्यासाठी रसायनांचा वापर

फळे पिकविण्यासाठी रसायनांचा वापर

Published On: May 13 2018 2:15AM | Last Updated: May 13 2018 1:05AMम्हाकवे : डी. एच. पाटील

हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत असून, कोल्हापूर जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे फळांची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे मागणीनुसार फळे कमी पडत असल्याने फळे पिकविण्यासाठी रासायनिक औषधांचा वापर करत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अन्‍न व आरोग्य खाते याकडे दुर्लक्ष करत असून फळांचे व्यापारी नागरिकांच्या  आरोग्याशी खेळत आहेत. त्यामुळे शासनाने याबाबत कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेकापचे भाई संपतराव पाटील यांनी केली आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याने फळांची संख्या वाढली आहे. ही फळे लवकर पिकावीत याकरिता रासायनिक औषधांचा अतोनात वापर केला जात आहे. नैसर्गिक पद्धतीने फळे पिकवण्याची पद्धत अधिक वेळ घेणारी आहे. त्यामुळे सर्वच प्रकारची फळे केमिकल, कार्बाईट असे रासायनिक घातक पदार्थ वापरून पिकवली जात आहेत. त्यामुळे फळे खाणार्‍या नागरिकांचा आरोग्यावर दूरगामी परिणाम होत आहे. अन्‍नसुरक्षा कायदा आहे. मात्र, तो फक्‍त कागदावरचा रसायनांचा वापर करून अशा कृत्रिमरीत्या पिकवलेल्या फळांची सर्रास विक्री सुरू आहे.कोल्हापूर जिल्ह्यास ग्रामीण भागात सर्रास अशी फळे विकली जात आहेत.  केळी, सफरचंद, संत्री या फळांवर रसायनांचा वापर केल्यास 20 तासांत ही फळे पिकतात. केळी पिकविण्यासाठी पूर्वी भरीचा वापर केला जात होता; परंतु हा वापर वेळखाऊ असल्याने रसायनांचा वापर सुरू झाला. अमलयुक्‍त रसायन पाण्यात टाकून त्यामध्ये केळी बुडवली जातात. त्यामुळे केळी दोन दिवसांत पिकतात. केळीबरोबरच  मोसंबी, पपई, पेरू, चिकू, द्राक्षे, आंबा, टोमॅटो, गाजर, मिरची आदी फळेही रसायनाने पिकवली जात आहेत.     

रसायनयुक्‍त फळे खाण्यामुळे नागरिकांमध्ये विविध आजारांचे प्रमाण वाढत आहेत. मधुमेह, अर्धांगवायू, शुगर हा रासायनिक फळे खाण्याचाच परिणाम आहे. रासायनिक प्रक्रिया करून विक्री करणार्‍यावर कोण नियंत्रण ठेवणार? असा प्रश्‍न विचारला जात आहे. वास्तविक फळे नैसर्गिक पद्धतीने पिकविणे अधिक हिताचे आहे. मात्र, व्यापारी लोकांना नागरिकांच्या आरोग्याशी काहीच देणे घेणे नाही. केवळ पैसे  मिळवणे हाच उद्देश आहे. त्यामुळे अन्‍नसुरक्षा व आरोग्य विभागाने याबाबत कठोर कारवाई करावी, अशी मागणी  होत आहे.