होमपेज › Kolhapur › अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर

अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर

Published On: Dec 03 2017 1:32AM | Last Updated: Dec 03 2017 12:18AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

मानधनवाढीसाठी महिनाभर कामबंद आंदोलन केल्यानंतर स्वत: मुख्यमंत्र्यांनी 2000 रुपयांची भाऊबीज व मानधनवाढ देण्याचे आश्‍वासन दिले होते; पण त्यालाही दोन महिने होऊन गेले, तरी अजून काहीही पदरात पडलेले नसल्यामुळे संतापलेल्या अंगणवाडी कर्मचारी महिलांनी शनिवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून फसवणूक करणार्‍या राज्य शासनाचा निषेध नोंदवला. 

कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनचे कॉ. आप्पा पाटील, कॉ. जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली दुपारी महावीर गार्डन येथून मोर्चाला सुरुवात झाली. मानधनवाढीपासून फसवणूक करणार्‍या मुख्यमंत्री व ग्रामविकासमंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणा देत मोर्चा दुपारी जिल्हा परिषदेवर येऊन धडकला.  अंगणवाडी संपावेळी 5 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत अंगणवाडी सेविकांना 2000 रुपयांची भाऊबीज दिली जाईल, असे सांगितले होते; पण 24 नोव्हेंबरला काढलेल्या अध्यादेशात सेविका व मदतनिसांना पूर्वीप्रमाणेच 1000 रुपये देण्याचे जाहीर केले आहे. यावरून सेविका व मदतनिसांमध्ये संतापाची लाट आहे. याचा निषेध मोर्चाद्वारे केला गेला. 

अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मागण्या...

दरमहा 18,000 रुपये वेतन मिळावे,   निवृत्तीवेतन किमान 3000 रुपये द्यावे,   पेन्शन योजना 2008 पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने द्यावी, खासगी बालवाड्या बंद कराव्यात,   दरमहा 5 तारखेपर्यंत मानधन मिळावे,   टी.एच.आर. बंद करून शिजवलेला आहार द्यावा,   साहित्य अंगणवाड्यांवर पोहोच करावे,   अंगणवाडीसाठीचे रजिस्टर ग्रामपंचायतींनी द्यावे,   सेविका, मदतनिसांना वैद्यकीय उपचार, रजा मिळाव्यात,   मासिक मिटिंग शनिवारी घेऊ नये,