Wed, Jul 24, 2019 12:38होमपेज › Kolhapur › पंचगंगेला आणखी किती द्यायचे बळी?

पंचगंगेला आणखी किती द्यायचे बळी?

Published On: Mar 22 2018 1:32AM | Last Updated: Mar 21 2018 10:52PMकोल्हापूर : विजय पाटील.

प्रदूषित पाण्यामुळे माणसे मृत्युमुखी पडण्याचे सत्र मागील पंचवीस वर्षांपासून सुरूच आहे. कावीळ, गॅस्ट्रो हे आजार कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरासह पंचगंगेच्या काठावर असलेल्या 174 गावांत प्रदूषित पाण्याची देणगी दिल्यासारखे कायम आहेत. प्रदूषित पाण्यामुळे होणार्‍या आजारांनी शेकडो लोकांचे नाहक बळी गेले आहेत. या नाहक बळींची जबाबदारी महापालिका, इचलकरंजी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे. कारण, पंचगंगा बचावचा नारा देणारी तत्कालीन तरुण पिढी आता ज्येष्ठ झाली असूनही मुर्दाड यंत्रणांना ठोस उपाययोजना करता आलेल्या नाहीत. 

इचलकरंजीत प्रदूषित पाण्यामुळे 2012 साली काविळीची साथ आली. या साथीत 42 नागरिकांचा नाहक बळी गेला. शेकडो नागरिक या साथीत आजारी पडले. प्रदूषित पाण्यामुळे सर्वाधिक बळी जाणारी ही गंभीर घटना होती. तत्पूर्वीही अनेकांचे जीव प्रदूषित पाण्यामुळे जात होते. महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून लौकिक असणार्‍या या शहरातील पाणी प्यायला माणसे दचकत होती. काळा ओढा, चंदूर ओढा, तिळवणी ओढा या ओढ्यांचे सांडपाणी येथील नदीला प्रदूषित करण्यापासून रोखणे प्रशासनालाही अद्याप शक्य झाले नाही. या परिसरातील रूई बंधार्‍यानजीक नदीच्या पात्रात पाणी कमी आणि केंदाळ जास्त असते. साधे केंदाळ निर्मूलनही या परिसरात शक्य झालेले नाही.

कोल्हापूर शहरातही काविळीने अनेकांचे बळी गेले होते. यामध्ये गर्भवती महिलांच्या बळींची संख्या जास्त होती. कोल्हापूर, इचलकरंजीसह ग्रामीण भागातील अनेक नागरिक  गॅस्ट्रोच्या साथीमुळे दवाखान्यांचे बिल भरून कंगाल झाले आहेत. कावीळ आणि गॅस्ट्रोमुळे दगावलेल्यांची रीतसर प्रदूषित पाण्याचा उल्लेख करून नोंद केली जात नाही. ही जर नोंद केली असती, तर तीन ते चार हजारांहून अधिक नागरिक प्रदूषित पाण्याने बळी गेल्याची नोंद असती. याशिवाय दोन-अडीच लाखजण पाण्यामुळे गंभीर आजारी पडल्याचा आकडा दिसून आला असता. 

अद्यापही पंचगंगेचे प्रदूषण कमी झालेले नाही. कागदोपत्री मात्र सरकारी यंत्रणेकडून दिशाभूल केली जाते. प्रदूषण कमी झाल्याचे ढोल बडवले जातात. प्रत्यक्षात मागील पंचवीस वर्षांत पंचगंगेच्या नावाखाली खर्च झालेल्या निधीचे ऑडिट व्हायला हवे, तरच प्रदूषणमुक्‍तीचा भेसूर चेहरा समोर येऊ शकेल. 

Tags : Kolhapur, Kolhapur News. last twenty five years, death increases, due to, polluted water, has started