Thu, Apr 25, 2019 11:29होमपेज › Kolhapur › पुढील गाळप हंगाम ऑक्टोबरपासून

पुढील गाळप हंगाम ऑक्टोबरपासून

Published On: Apr 27 2018 12:44AM | Last Updated: Apr 27 2018 12:41AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर विभागात गतवर्षीच्या तुलनेत यंदा उसाचे गाळप साडेचौदा लाख मेट्रिक टनांनी जास्त होणार असल्याने पुढील गळीत हंगामात साखर कारखाने नोव्हेंबरऐवजी ऑक्टोबरपासूनच सुरू करावे लागणार आहेत, अशी शिफारस मंत्री समितीला करणार आहे, अशी माहिती पुणे साखर आयुक्‍तालयातील साखर सहसंचालक (विकास) डी. आय. गायकवाड यांनी दिली. मजूर टंचाईमुळे ऊस तोडणी अधिकाधिक यंत्रामार्फतच व्हावी, यासाठी आतापासून कारखान्यांनी यंत्राची उपलब्धता करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.पुढील गळीत हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूर व सांगली या दोन जिल्ह्यांसाठी दोन टप्प्यात झालेल्या या बैठकीला विभागीय कृषी संचालक उमेश पाटील, कोल्हापूर विभाग साखर सहसंचालक सचिन रावळ यांच्यासह दोन जिल्ह्यांतील कारखान्यांचे शेती अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत पुढील हंगामात गाळपासाठी उपलब्ध होणार्‍या उसाची माहिती घेण्यात आली असता,  2018-19  या गळीत हंगामासाठी  कोल्हापूर व सांगली असा एकत्रित 227 लाख मेट्रिन टन ऊस निव्वळ गाळपासाठी उपलब्ध होणार आहे. 2017-18 या हंगामात हेच प्रमाण 213 लाख मेट्रिक टन इतके होते. म्हणजे यावर्षी 14.58 लाख मेट्रिक टन अतिरिक्‍त उसाची भर पडली आहे. शिवाय 86032 व 265 सारख्या वाणामुळे उसाची उत्पादन क्षमताही वाढली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऊस असल्याने त्याचे गाळप वेळेत होणे गरजेचे आहे.

नुकत्याच संपलेल्या गळीत हंगामात मजुरांच्या टंचाईचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला होता. यावर्षी तर विदर्भ, मराठवाड्यात मजूर येतील, याची शक्यता नाही. त्यामुळे यंत्रापासूनच तोडणी करण्यावर भर द्यावा लागणार आहे. सध्यस्थितीत कारखान्यांकडे 252 तोडणी यंत्रे आहेत. 300 ची मागणी नोंदवली गेली आहे. एकूण उसाच्या व कारखान्यांच्या तुलनेत अजूनही ही मागणी कमीच असल्याने ती वाढण्यासाठी कारखान्यांनी आतापासूनच प्रयत्न करायला हवेत, असे ते म्हणाले.

Tags : Kolhapur, next, Galap, season, October