Mon, Jul 22, 2019 03:38होमपेज › Kolhapur › ज्येष्ठ नागरिकांसाठी श्रावणानिमित्त मोफत सहली 

ज्येष्ठ नागरिकांसाठी श्रावणानिमित्त मोफत सहली 

Published On: Aug 14 2018 1:09AM | Last Updated: Aug 14 2018 12:31AMकोल्हापूर : प्रतिनिधी

श्रावण महिन्याचे औचित्य साधून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणेने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत देवदर्शन सहलींचे आयोजत करण्यात आले आहे. श्रावण मासातील प्रत्येक सोमवारी व शुक्रवारी ही देवदर्शन यात्रा होणार आहे. याचा शुभारंभ शुक्रवारी (दि. 17) सकाळी 7.30 वाजता  अंबाबाई मंदिरापासून होणार आहे, अशी माहिती या सहलीचे संयोजक राहुल चिकोडे व प्रमोद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राहुल चिकोडे म्हणाले, जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी पालकमंत्री पाटील यांनी यापूर्वी  नवऊर्जा महोत्सव, आडवाटेवरील कोल्हापूर अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करून कोल्हापूरच्या जनतेला प्रेक्षणीय, धार्मिक व सांस्कृतिक दर्शन घडवून आणले. यातून पर्यटनाचा नवा मार्ग सुरू झाला आहे. आता  ज्येष्ठ नागरिकांसाठी जिल्ह्यातील प्राचीन देवांचे दर्शन, एकदिवसीय आध्यात्मिक सहलींचे आयोजन करण्यात येत आहे. 50 वर्षांवरील स्त्री व पुरुषांना ही सहल मोफत आहे.

या सहलीच्या निमित्ताने मनपाडळे (मारुती मंदिर), शिरोळ (गणेश मंदिर), नृसिंहवाडी (दत्त मंदिर), खिद्रापूर (महादेव मंदिर) या देवांचे दर्शन घडणार आहे. सहलीत उपवासाचे पदार्थ, फळे व इतर सुविधा दिल्या जातील. दुर्ग सहली आयोजित करणार्‍या हिल रायडर्स फांऊडेशनने या सहलीचे नियोजन केले असून संवेदना सोशल फाऊंडेशनने त्यासाठी सहकार्य केले आहे. इच्छुकांनी समिट अ‍ॅडव्हेंचर्स, पर्ल हॉटेलशेजारी न्यू शाहूपुरी येथे आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन चिकोडे यांनी केले आहे. यावेळी विनोद कांबोज उपस्थित होते.