Wed, Apr 24, 2019 00:14होमपेज › Kolhapur › केंद्र सरकारकडून जनतेची फसवणूक

केंद्र सरकारकडून जनतेची फसवणूक

Published On: May 31 2018 1:38AM | Last Updated: May 30 2018 11:18PMकोल्हापूर: प्रतिनिधी

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला सरकारच जबाबदार असून, ते जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आला. इंधन दरवाढीच्या विरोधात बुधवारी शहरात सायकल रॅली काढण्यात आली. बैलगाडीत दुचाकी ठेवून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध करण्यात आला.टेंबे रोडवरील पक्षाच्या कार्यालयापासून रॅलीला प्रारंभ झाला. सायकल सोबत कार्यकर्ते पायी चालत होेते. केंद्र शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत रॅली देवल क्‍लब, खासबाग मैदान, मिरजकर तिकटी मार्गे बिनखांबी गणेश मंदिर येथे आली. यानंतर महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका मार्गे शिवाजी चौकात रॅलीची सांगता झाली.

टी.एस.पाटील म्हणाले, या सरकारने गेल्या चार वर्षात कोणतीही आश्‍वासने पूर्ण केलेली नाहीत. शेतकरी, कष्टकरी, दलित यांच्यासाठी काही केलेले नाही. जे केले म्हणून सांगितले जाते, त्याचा खोटेपणा दिसू लागला आहे. अद्याप कोणाच्याच खात्यावर 15 लाख जमा झालेले नाहीत. काळा पैसा बाहेर येणार होता, तो दिसत नाही. नोटबंदीने लोकांचेच कंबरडे मोडले, तरीही हे सरकार ते मान्य करत नाही. आपलेच खरे असल्याचे भासवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

संभाजी जगदाळे म्हणाले, कर्नाटकाच्या निवडणुका होईपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते. मात्र, मतदान झाल्यानंतर लगेच ते वाढवण्यात आले. यामुळे ही दरवाढ सरकारच्याच हातात आहे हे स्पष्ट झाले आहे. इंधनाची देवघेव करणारे, पंप धारक हे मोठे भांडवलदार आहेत, त्यांच्या हितासाठी, श्रीमंताना अधिक श्रीमंत करण्यासाठीच या सरकारचा प्रयत्न सुरू आहे. रॅलीत बाबुराव कदम, सुभाष सांवत, रविंद्र कोतमिरे, बाबा माने, मधुकर हरेल, स्वप्नील पाटोळे  आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.