Mon, Jul 15, 2019 23:41होमपेज › Kolhapur › गोव्यातील चार तरुणांचे अपहरण?

गोव्यातील चार तरुणांचे अपहरण?

Published On: Dec 12 2017 2:05AM | Last Updated: Dec 12 2017 1:32AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

शिर्डी येथे देवदर्शनासाठी गेलेल्या गोव्याच्या चार तरुणांचे अपहरण झाल्याचा प्रकार सोमवारी समोर आला. हे तरुण गोव्यातील म्हापसा येथील राहणारे असून पालकांना धमकीचे फोन आल्याने त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. अपहरणकर्त्यांनी रविवारी मुलांच्या पालकांना संकेश्‍वरमध्ये बोलावले होते; पण या ठिकाणी त्यांचा कोणताच ठावठिकाणा लागला नाही. याबाबत सोमवारी रात्री गुन्हा दाखल होणार असल्याचे पोलिस सूत्रांकडून समजले.

म्हापसा येथील चार तरुण शुक्रवारी शिर्डी येथे देवदर्शनासाठी आले होते. देवदर्शन आटोपून शनिवारी सर्व जण गोव्याकडे निघाले. शनिवारी ते पुण्यापर्यंत आले. इथून त्यांनी आपल्या पालकांना फोन केला होता. यानंतर सर्वांचे फोन बंद झाले.

खंडणीची मागणी

रविवारी सकाळी चौघांचे अपहरण करण्यात आल्याचे अज्ञाताने फोनवरून पालकांना सांगितले. मुलांची सुटका करण्यासाठी खंडणीची रक्‍कम घेऊन संकेश्‍वर येथे येण्यास सांगण्यात आले. भयभीत पालकांनी रविवारी संकेश्‍वर गाठले. यानंतर फोनवरून अज्ञाताने निपाणीनजीक बोलावले. रविवारी दिवसभर या अपहरणकर्त्यांनी त्यांना हुलकावणी दिली.

सीमाभागात लोकेशन

अपहरणकर्त्यांनी मुलांचे काही बरेवाईट करू नये, यासाठी पालकांनी याची माहिती पोलिसांना दिली नाही; पण रविवारी दिवसभर शोध घेऊनही मुले मिळून आली नाहीत. याची माहिती पोलिसांना देण्यात आली.

अपहरण झालेली मुले गोव्याची आहेत. ती शिर्डी, पुणे या ठिकाणी आली होती, हे स्पष्ट झाले; पण यानंतर पालकांना अज्ञाताने फोनवरून संकेश्‍वर येथे येण्यास सांगितले. दोन दिवस या मुलांचा शोध सुरू असल्याने गुन्हा दाखल होण्यास विलंब होत होता. यामुळे पोलिस महासंचालकांकडून याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले.