होमपेज › Kolhapur › लूटमारीतील चौघे मुंबई टोळीतील

लूटमारीतील चौघे मुंबई टोळीतील

Published On: Feb 09 2018 2:00AM | Last Updated: Feb 09 2018 1:19AMकोल्हापूर : प्रतिनिधी

मुंबईतील सराफाला 40 लाखाला लुटल्याप्रकरणात मुंबईतील गुन्हेगार टोळीतील चौघे जण असल्याचे निष्पन्न झाले आहे. स्थानिक टिपरने त्यांनी हाताशी धरून लूटमारीचा कट रचल्याचे गुरुवारी चौकशीत उघड झाले. या टिपरला सराफाच्या आर्थिक उलाढालीची माहिती असल्याचे समोर आले आहे. मोटारीच्या क्रमांकासह मालकाचेही नाव निष्पन्न झाल्याने दिवसभर सातारा, पुणे व पनवेल येथे छापे टाकण्यात आले. शुक्रवारी सायंकाळपर्यंत लुटारू टोळीचा पर्दाफाश होईल, अशी शक्यता वरिष्ठ सूत्रांकडून वर्तविण्यात आली.

दरम्यान, लूटमारप्रकरणी रात्री उशिरा विशेष पथकाने मुंबईतील दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मोबाईलचा सीडीआरही तपासण्यात येत आहे. मात्र, याबाबत गोपनीयता पाळली जात आहे.
मुंबईतील सराफ कांतिलाल मेहता यांच्यावर हल्ला करून लुटारू टोळीने सुमारे 40 लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना गुजरीतील जैन मंदिराजवळ बुधवारी (दि. 7) पहाटे घडली होती. मध्यवर्ती व्यापारपेठेत ही घटना घडल्याने पश्‍चिम महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

आठ पथके रवाना; धागेदोरे हाती
हल्लेखोरांचा छडा लावण्यासाठी वरिष्ठाधिकार्‍यांनी जोरात फिल्डिंग लावली असून आठ विशेष पथके ठिकठिकाणी रवाना केली आहेत. चौकशीत पथकाच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. गुन्ह्यात वापरलेल्या मोटारीच्या क्रमांकासह मालकाचेही नाव निष्पन्न झाले 

आहे. वाहन मालक व चालकाचा शोध सुरू आहे. रात्रीपर्यंत त्याचा सुगावा लागला नव्हता. संबंधितांच्या नातेवाईकांकडे चौकशी करण्यात येत आहे, असेही समजते.

महिनाभर पाळत
सराफ मेहता आठवड्यातून एक, दोन वेळा लक्झरीने कोल्हापूरला येत असत. त्यांच्याकडे किमान 50 ते 60 लाखांचे दागिने असल्याची कोल्हापूर येथील एका तरुणाला माहिती होती. महिन्यापासून संबंधित तरुण व्यापार्‍याच्या पाळतीवर होता. मेहतांचा त्याने मुंबईपर्यंतही पाठलाग केला होता. सराफाला लुटल्यास झटपट श्रीमंती चालून येईल, या आशेत असणार्‍या तरुणाने दोन आठवड्यांपूर्वी गुन्हेगारीशी संबंधित मुंबईतील साथीदारांना गाठले.व्यापार्‍याच्या आर्थिक उलाढालीची टिप देऊन कोल्हापुरात बसस्थानक अथवा गुजरीत लुटण्याचा बेत ठरल्याचेही चौकशीत उघड झाल्याचे समजते.
सराफ गुरुवारी पहाटे कोल्हापूरला येणार असल्याची पक्की खबर मिळाल्याने टिपरने मुंबईतील हल्लेखोरांशी संपर्क साधला. मंगळवारी (दि. 6) रात्री चालकासह पाच जण मोटारीतून कोल्हापूरकडे निघाले. दुसर्‍या दिवशी पहाटे 4 वाजून 10 मिनिटांनी सर्व जण कोल्हापूर बसस्थानकावर आले. यावेळी टिपर बसस्थानकासमोरील चौकात थांबला होता.

रेकी करून माहिती घेतली
पहाटे 4.10 ते 5.50 वाजेपर्यंत टिपरसह सहा जणांनी बसस्थानक, रिक्षा थांब्यासह गुजरीतील घटनास्थळाची ‘रेकी’ केली. चालकाला सर्व रस्त्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पहाटे 6 वाजून 1 मिनिटांनी सर्व जण बसस्थानक चौकात गेले. पहाटे 6.05 वा. लक्झरी दाखल झाली.

टिपरने सराफाकडे बोट करून साथीदारांना खुणविले
सराफ मेहता लक्झरीतील उतरल्यानंतर स्थानिक टिपरने मुंबईतील साथीदारांना त्यांच्याकडे बोट करून खुणविले. मेहता यांनी घाईगडबडीत रिक्षा गाठली. गुजरीच्या दिशेने रिक्षा निघाल्यानंतर साथीदारांनी मोटारीतून पाठलाग सुरू केला. 

अन् अवघ्या काही मिनिटांत सराफाला लुटले!

गुजरीतील घटनास्थळापासून काही अंतरावर मोटार थांबविण्यात आली. त्यानंतर काही मिनिटांतच हल्ला करून सराफाला लुटल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. वरिष्ठाधिकार्‍यांनी या वृत्ताला रात्री उशिरा दुजोरा दिला. त्यामुळे लूटमारप्रकरणातील स्थानिक टिपर कोण, याकडे सार्‍यांच्या नजरा लागल्या आहेत. 

लूटमारीची घटना घडल्यानंतर टिपर काहीकाळ गुजरी परिसरात वावरत होता, असेही चौकशीतून पुढे आले आहे. गुरुवारी सायंकाळपासून टिपर गायब झाला आहे. त्याचे नाव, गाव याबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली आहे.