Wed, Mar 27, 2019 06:01होमपेज › Kolhapur › राहुल चव्हाण खूनप्रकरणी भास्कर टोळीतील चौघे निर्दोष 

राहुल चव्हाण खूनप्रकरणी भास्कर टोळीतील चौघे निर्दोष 

Published On: Jun 06 2018 1:42AM | Last Updated: Jun 06 2018 1:23AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जवाहरनगर येथील ‘आरसी’ गॅगचा म्होरक्या राहुल चव्हाण याच्या खूनप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावलेल्या भास्कर टोळीचा प्रमुख अमोल महादेव भास्करसह चौघांची मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी निर्दोष मुक्‍तता केली. सूडचक्रातून 2007 मध्ये जवाहरनगर येथे ही घटना घडली होती.मुंबई उच्च न्यायालयाने चौघांची निर्दोष मुक्‍तता केल्यानंतर भास्कर टोळीतील समर्थकांनी जवाहरनगर, सुभाषनगरात फटाके फोडल्याने तणाव निर्माण झाला होता. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात सायंकाळी पोलिसांचा फौजफाटा पाचारण करण्यात आला आहे. 

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. बी. गवई, सारंग कोतवाल यांनी हा निर्णय दिला. त्यानुसार अमित ऊर्फ पिंटू महादेव भास्कर (वय 28), अमोल महादेव भास्कर (34), सुरेश मारुती शिंदे (51), महादेव शामराव भास्कर (58, रा. जवाहरनगर, कोल्हापूर) यांची निर्दोष सुटका झाली आहे. आजन्म कारावास भोगणार्‍या चौघांनी अकरा वर्षे शिक्षा भोगली आहे, असे आरोपीचे वकील निरंजन मुंडरगी यांनी दै.‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

जवाहरनगर, सुभाषनगर येथील वर्चस्व वादातून राहुल चव्हाण ऊर्फ आर.सी. व अमोल भास्कर यांच्यात वैमनस्य निर्माण झाले होते. भास्कर टोळीने 2007 मध्ये राहुल चव्हाणवर हल्ला करून त्याचा खून केला होता. याप्रकरणी अमोलसह चौघांना अटक झाली होती. 2009 मध्ये जिल्हा न्यायालयाने चौघांना दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. या निर्णयावर आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्यावर न्यायमूर्ती गवई, कोतवाल यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू होती.भास्कर टोळीतील चौघांना निर्दोष मुक्‍तता झाल्याने त्याच्या समर्थकांनी फटाके फोडले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. सहायक पोलिस निरीक्षक शहाजी निकम म्हणाले. भास्कर टोळीतील समर्थकांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे.कोणताही अनुचित प्रकार घडल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.