Sun, May 26, 2019 21:48होमपेज › Kolhapur › सात महिन्यांमध्ये चार लाख प्रवासी ‘वायफाय’

सात महिन्यांमध्ये चार लाख प्रवासी ‘वायफाय’

Published On: Sep 11 2018 1:36AM | Last Updated: Sep 10 2018 11:43PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना इंटरनेटचा वापर करता यावा याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजिटल इंडियाला अनुसरून रेल्वे मंत्रालयाने रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली. वायफाय चा पुरेपूर वापर करत गेल्या सात महिन्यांत (जानेवारी ते जुलै) 131.29 हजार जीबी डेटा प्रवाशांकडून वापरण्यात आला आहे. या कालावधीत या दोन रेल्वे स्थानकांवर 4 लाख 5 हजार 81 प्रवाशांनी या वायफाय सुविधेचा लाभ घेतला आहे.

कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज टर्मिनल्स आणि मिरज जंक्शनचा देखील समावेश करण्यात आला. या रेल्वेस्थानकांवर मिळणार्‍या मोफत वायफाय सेवेचा वापर करण्यात प्रवाशांनी कसलीही कसर सोडली नाही. आजकाल मोबाईल हे सर्वांच्याच हातातलं खेळण बनले आहे. 

मोबाईलला इंटरनेटची साथ लाभल्याने अवघड कामेही अगदी सहजरीत्या या मोबाईल आणि इंटरनेटमुळे पार पडतात. रेल्वेच्या तिकीट बुकिंगपासून ते विमानाच्या तिकीट बुकिंग आपण आज मोबाईलवर करू शकतो. याच इंटरनेटचा लाभ रेल्वेच्या प्रवाशांना मिळावा याकरिता पहिल्या टप्प्यात देशातील दोनशेहून अधिक रेल्वेस्थानकांत मोफत वायफाय सुविधा सुरू करण्यात आली आहे. तर दुसर्‍या टप्प्यात कोल्हापूर आणि मिरज या दोन्ही रेल्वे स्थानकांत ही सुविधा सुरू करण्यात आली. या रेल्वेस्थानकांत (जानेवारी2018) पासून मोफत वायफाय सुविधा उपलब्ध झाली. रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीतील रेलटेल कार्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीतर्फे कोल्हापूर रेल्वे स्थानकात एकूण 16 अ‍ॅक्सेस पॉईट बसविण्यात आले आहेत.  ही वायफाय सुविधा वापरण्याकरिता लॉगइन करणारा प्रत्येक प्रवासी सरासरी 330 एमबी डेटाचा वापर करतो. 

मिरज रेल्वे स्थानकात जानेवारी ते जुलै या कालावधी दरम्यान (83.05 टीबी) 83.05 हजार जीबी डेटा वापरण्यात आला आहे. 2 लाख 53 हजार 932 प्रवाशांनी या सुविधेचा वापर केला आहे. जुलै महिन्यात 47 हजार 670 प्रवाशांकडून (15.80 टीबी) 15.80 हजार जीबी डेटा वापरण्यात आला आहे. ही वायफाय सुविधा वापरण्याकरिता दररोज सरासरी 1538 प्रवासी लॉग इन करतात. तसेच सरासरी 521 जीबी डेटाचा वापर प्रवाश्यांकडून दररोज करण्यात येतो. ही वायफाय सुविधा वापरण्याकरिता लॉगइन करणारा प्रत्येक प्रवासी सरासरी 347 एमबी डेटाचा वापर करतो.

दररोज 913 प्रवाशांकडून लॉग इन 

या मोफत मिळणार्‍या वायफाय सेवेचा वापर करण्यात प्रवाशांनी कोणतीही कसर सोडली नाही. कोल्हापूर रेल्वे स्थानकात ही वायफाय सुविधा चालू झाल्यापासून (जानेवारी ते जुलै) (48.24 टीबी) 48.24 हजार जीबी डेटा वापरण्यात आला आहे. व 1 लाख 51 हजार 149 प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेतला. जुलै महिन्यात 28 हजार 314 प्रवाशांकडून (8.91 टीबी) 8.91 हजार जीबी डेटा वापरण्यात आला आहे. ही वायफाय सुविधा वापरण्याकरिता दररोज सरासरी 913 प्रवासी लॉग इन करतात. तसेच प्रवाशांकडून दररोज सरासरी 294 जीबी डेटाचा वापर करण्यात येतो.