Thu, Jul 18, 2019 10:37होमपेज › Kolhapur › चार अभियंते ‘करवीर’मध्ये १५ वर्षे तळ ठोकून

चार अभियंते ‘करवीर’मध्ये १५ वर्षे तळ ठोकून

Published On: Jul 06 2018 1:32AM | Last Updated: Jul 05 2018 11:40PMकोल्हापूर : विकास कांबळे

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडील मलईसाठी सोकावलेल्या आणि गेली  पंधरा वर्षे ठाण मांडून बसलेले चार शाखा अभियंत्यांची सध्या करवीरमध्ये जोरात चर्चा सुरू आहे. या शाखा अभियंत्यांनी करवीरमध्ये आपले स्वतंत्र संस्थानच निर्माण केले असून, त्यांना येथून हलविण्याचा प्रयत्न केला की ही मंडळी वाटेल ती किंमत मोजून आपली बदली करून घेत असल्याने हे चौघेजण सध्या चर्चेचा विषय बनले आहेत.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने पाणीपुरवठा योजनेची कामे केली जातात. शहरी असो किंवा ग्रामीण भागातील दोन्ही ठिकाणच्या पाणीपुरवठा योजनांची कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करत असत. महापालिकेचा किंवा नगरपालिकेचा स्वतंत्र पाणीपुरवठा असतो. मात्र, त्याठिकाणी कार्यकारी अभियंता म्हणून काम करणारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडील अभियंते असतात. याशिवाय, लागणारे अभियंते प्राधिकरणकडूनच घेतले जातात. ग्रामीण भागातील कामे जिल्हा परिषदेच्या वतीने केली जातात. जिल्हा परिषदेमध्येदेखील पाणीपुरवठा विभाग आहे.

याठिकाणीही देखील अभियंते जीवन प्राधिकरणकडूनच घेतले जातात. त्यामुळे महापालिकेचा असो अथवा जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा असो या ठिकाणी येणारे अभियंते प्रथम आपली सोय पाहत असतात. त्यांची जर व्यवस्थित ‘सोय’ झाली तर ही मंडळी जागा सोडायला तयार नसतात. त्यांची अस्थापना महापालिका किंवा जिल्हा परिषदेकडे नसते. त्यांची अस्थापना जीवन प्राधिकरणकडे असल्याने याठिकाणी ते कोणाला फारशी दादही देत नसल्याचे एका  अधिकार्‍यांच्या वर्तणुकीवरून दिसून आले आहे. जीवन प्राधिकरणकडे काही चांगलेही अभियंते आहेत, मात्र त्यांची संख्या कमी आहे.

जीवन प्राधिकरणकडे असेच चार शाखा अभियंता जिल्हा परिषदेकडे आले. तीन-चार वर्षांनी त्यांची बदली होणे अपेक्षित होती. मात्र, त्यांना करवीरमध्ये इतकी गोडी लागली की ते याठिकाणची जागाच सोडायला मागेनात. आतापर्यंत त्यांची तीन ते चार वेळा बदली झाली. मात्र, प्रत्येकवेळी ते बदली रद्द करून आणत असत. एकवेळ बदली लवकर रद्द झाली नाही आणि बदलीच्या ठिकाणी हजरही झाले नाही म्हणून एका शाखा अभियंत्याला नोटीस काढली. मात्र, या बहाद्दराने या नोटिसीला केराची टोपली दाखविली. एवढेच नव्हे तर बदलीच्या ठिकाणी हजर न होणार्‍या या शाखा अभियंत्यांचे वेतन थांबविण्याचे आदेश दिले. तरीदेखील ही चौकडी घाबरली नाही.

आता पुन्हा त्यांची बदली झाली आहे. बदली रद्द करण्यासाठी यातील दोघाजणांनी रयतेच्या क्रांतीसाठी सध्या धडपडत असलेल्या एका राज्यमंत्र्यांकडे धाव घेतली. राज्यमंत्र्यांनी त्यांच्या बदलीला स्थगिती दिली. त्यामुळे या दोघांची सुटका झाली. राहिलेल्या दोघांनी न्यायालयात धाव घेतली आहे. बदली झाली की ही चौघेजण कोणत्याही प्रकारे ती रद्द करून घेण्यात आतार्यंत यशस्वी झाले आहेत. अर्थात त्यासाठी त्यांची वाटेल ती किंमत मोजण्याची तयारी ठेवत असतात. त्यांची ही तयारी पाहून त्यांच्या कार्यकारी अभियंत्यांलाही तोंडात बोट घालण्याची वेळ येते. 

गेल्या पंधरा वर्षांपासून ते एकाच ठिकाणी असल्याने आपले आता कोणी काही करू शकत नाही, अशी त्यांची खात्री झाली असल्यामुळे सध्या ते वरिष्ठांनाही जुमानत नाहीत. त्यांनी आपले एक स्वतंत्र संस्थानच निर्माण केले आहे. हे संस्थान मोडण्याचे धाडस अधिकारी दाखविणार काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.