Tue, Jun 18, 2019 22:18होमपेज › Kolhapur › सभागृहाबरोबरच काँगे्रस ऐक्याचीही पायाभरणी

सभागृहाबरोबरच काँगे्रस ऐक्याचीही पायाभरणी

Published On: Jul 31 2018 1:31AM | Last Updated: Jul 31 2018 12:45AMकोल्हापूर : प्रतिनिधी

नव्या सभागृहाच्या पायाभरणीच्या निमित्ताने सोमवारी काँगे्रस पक्षातील नेत्यांच्या ऐक्याचीही पायाभरणी झाली. एक कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार्‍या या सभागृहाचा पायाभरणी समारंभ माजी खासदार कल्लाप्पा आवाडे, जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या हस्ते झाला. 

स्टेशन रोडवरील पक्षाच्या जागेत गेल्या 15 वर्षांपासून मोठ्या सभागृहाचा फक्त सांगाडाच उभा होता. या जागेवर भव्य सभागृह बांधण्यासाठी निधी नव्हता. पक्षाच्या मुख्य रस्त्यावरील इमारतीत 
असलेल्या कार्यालयांच्या भाड्यातून शिल्लक राहिलेल्या रकमेत या सभागृहाचे उर्वरित काम पूर्ण करण्यात येणार आहे. यावेळी  कल्लाप्पा आवाडे म्हणाले, जागा असूनही पक्षाची भव्य अशी वास्तू नव्हती, याची खंत मनात होती. मी पक्षाच्या ट्रस्टचा अध्यक्ष आहे, आजपर्यंत या ट्रस्टचा व्यवहार मान्य करून सर्वांनीच आम्हाला सहकार्य केले. मुख्य इमारतीतील भाड्यातून पक्षाच्या कार्यालयाचा खर्च, दुरुस्ती, नोकर पगार हा खर्च भागत होता. त्यातून शिल्लक राहिलेल्या 1 कोटीतून ही वास्तू उभी राहील. ट्रस्ट असला, तरी या वास्तूची मालकी ही पक्षाचीच असेल, त्यावर वहीवाट आणि त्याचा वापरही पक्षासाठीच होईल. हे काम अर्धवट राहणार नाही, यासाठी आता सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे. 

जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील म्हणाले, सत्तेत अवघ्या चार वर्षांपूर्वी आलेल्या पक्षांकडून कोट्यवधी रुपये खर्चून प्रत्येक जिल्ह्यात कार्यालये बांधली जात आहेत; पण आपले कार्यालय रखडले. आता ते पूर्ण होईल आणि यातून पक्षाला चांगली संजीवनी मिळेल. 

माजी खासदार जयवंतराव आवळे म्हणाले, सभागृहाच्या रखडलेल्या कामात आतापर्यंत कोणी हात घालण्याचे धाडस केले नव्हते. आवाडेदादांनी ते केले. या सभागृहासाठी माझ्यासह कार्यकर्त्यांनी फूल ना फुलाची पाकळी म्हणून काही तरी सहकार्य करण्याची गरज आहे. 

कार्यक्रमाला महापौर शोभा बोंद्रे, राज्य बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक, ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे, पी. डी. धुंदरे, सत्यजित पाटील, पक्षाचे ट्रस्टी नामदेव कांबळे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, जिल्हा बँकेचे संचालक विलास गाताडे, नगरसेवक सुभाष बुचडे, दिलीप पोवार, संजय मोहिते, डॉ. संदीप नेजदार, सुशील पाटील-कौलवकर, प्रवीण केसरकर, राहुल माने, इचलकरंजीचे राहुल खंजिरे, चंदा बेलेकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रदेश सरचिटणीस प्रकाश सातपुते यांनी केले. आभार नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांनी केले.