Thu, May 23, 2019 14:55
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › चाळीस घरफोड्या करणारा चोरटा जेरबंद : 70 तोळे दागिने हस्तगत

चाळीस घरफोड्या करणारा चोरटा जेरबंद : 70 तोळे दागिने हस्तगत

Published On: May 31 2018 1:38AM | Last Updated: May 31 2018 12:56AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

शहरासह उपनगरात तब्बल 40 घरफोड्या करणार्‍या अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले. प्रशांत काशिनाथ करोशी (वय 32, रा. इस्पुर्ली, करवीर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 70 तोळे सोन्याचे दागिने, दोन किलो चांदीचा ऐवज, टीव्ही, लॅपटॉप, कॅमेरे असा सुमारे 27 लाख 32 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 

सानेगुरुजी वसाहत, राजोपाध्येनगर, फुलेवाडी रिंगरोड, मोहिते पार्क, साळोखेनगर, जीवबा नाना पार्क, कळंबा, इंगवलेनगर, नवीन वाशीनाका या परिसरात घरफोड्या केल्याची कबुली त्याने दिली आहे. या परिसरात दिवसभर फिरून रेकी केल्यानंतर रात्री तो घरफोडी करीत होता. चोरीचे सोने विकण्यासाठी तो रविवारी भेंडे गल्‍लीत येणार असल्याची माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला दोन जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

हायड्रोलिक जॅकमशिनमुळे धागेदोरे

बोंद्रेनगरातील एका चोरीवेळी घरमालक आल्याने या ठिकाणी हायड्रोलिक जॅकमशिन सोडून करोशी पळून गेला होता. या मशिनबाबत उपनिरीक्षक राजेंद्र सानप आणि त्यांच्या सहकार्‍यांनी माहिती घेतली. यावेळी मशिन ऑनलाईन शॉपिंगद्वारे घेतल्याचे समजले. यामुळेच चोरट्याबाबत पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. 

एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड लंपास

चोरीवेळी तिजोरीतील एटीएम, क्रेडिट कार्ड, पासपोर्ट, आधारकार्ड, पासबुक, चेकबुक अशी कागदपत्रे तो सोबत नेत होता. या कागदपत्रांमध्येच त्याला अनेकदा एटीएमचे, क्रेडिट कार्डचे पिन नंबर मिळाले. याद्वारे त्याने अनेकदा रक्‍कम काढली आहे. 

मध्यरात्री एटीएमचा वापर

चोरीतील एटीएम कार्डचा पिन नंबर मिळाल्यास तो हेल्मेट, स्कार्फ बांधून एटीएम सेंटरवर जात होता. पैसे काढताना आपण कोणत्याही सीसीटीव्हीत दिसणार नाही, याची खबरदारी तो घेत असे. तसेच मध्यरात्री दोन ते पहाटे सहा यावेळेतच त्याने अनेकदा पैसे काढल्याचेही समोर आले आहे. 

चोरीच्या वस्तू ठेवण्यासाठी फ्लॅट

घरफोडीतील मुद्देमाल ठेवण्यासाठी प्रशांत करोशीने स्वतंत्र फ्लॅट भाड्याने घेतला होता. फुलेवाडी रिंगरोडवरील लक्ष्मीनारायण कॉलनीत तो एकटाच राहत होता. फ्लॅटमध्ये येणार्‍यांना संशय येऊ नये, यासाठी चोरीतील लॅपटॉप, मुद्देमाल बॅगेत भरून त्या बॅगा दोरी बांधून खिडकीतून बाहेर सोडल्या होत्या. 

दिवसा रेकी, रात्री घरफोडी

फुलेवाडी रिंगरोडवर फ्लॅट भाड्याने घेऊन राहणारा प्रशांत करोशी दिवसा परिसरात फिरत असे. सायंकाळी चार ते रात्री नऊ यावेळेत बंद बंगल्याची पाहणी करीत असे, त्यानंतर तो रात्री दहा वाजता पुन्हा बंगल्यात कोणी आले आहे का, याची खात्री करत होता. मध्यरात्री 12 नंतर बंगल्यातील लाईट बंद दिसली की त्याच बंगल्यात चोरी करीत होता, असे तपासात पुढे आले आहे. 

रेकॉर्डवरील गुन्हेगार 

बी. ए. चे शिक्षण घेतलेला प्रशांत करोशी याच्यावर यापूर्वीही जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी व राजारामपुरी या ठाण्यात फसवणुकीचे चार व मोटारसायकल चोरीचे तीन गुन्हे नोंद आहेत. त्याने 2017 व 2018 या दोन वर्षांत केलेल्या 40 घरफोड्यांची कबुली दिली आहे. या कामगिरीबद्दल एलसीबी पथकाला पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी बक्षीस जाहीर केले. पोलिस अधीक्षक मोहिते व अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते, उपनिरीक्षक युवराज आठरे, सचिन पंडित, राजेंद्र सानप, विजय कोळी, सुरेश चव्हाण, श्रीकांत मोहिते, राम कोळी, संदीप कुंभार, संजय पडवळ, ओंकार परब, दिलीप वासमकर, अमित सर्जे, वैशाली पाटील, नीलम कांबळे यांनी कामगिरीत सहभाग घेतला.

गुन्हे दाखल न केल्याने कारवाई

ऑक्टोबर 2017 मध्ये राजोपाध्येनगर, कणेरकरनगर परिसरात घरफोडीच्या चार ते पाच घटना घडल्या. परंतु, याची नोंद राजवाडा पोलिसांत झाली नाही. डी. बी. पथकातील कर्मचार्‍यांनी चोरट्यांचा शोध घेऊन तुमचा ऐवज मिळवून देऊ, असे सांगून फिर्याद दाखल केली नव्हती. संशयित प्रशांत करोशीकडून मुद्देमाल हस्तगत केल्यानंतर त्याने दाखविलेल्या घटनास्थळांवरून तब्बल सात महिन्यांनी याची नोंद पोलिसांत करण्यात आली. यामुळे टाळाटाळ करणार्‍या संबंधित पोलिसांवर कारवाई करणार असल्याचे पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले.

बँकेतील नोकरी सोडली

संशयित प्रशांत करोशी एका राष्ट्रीयीकृत बँकेत मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरीला होता. विम्याची कामे तो करीत होता. झटपट पैशाच्या हव्यासातून त्याने नोकरी सोडली. सध्या आपण पुण्यामध्ये नोकरीला असल्याचे त्याने घरच्यांना खोटे सांगितले होते.

ऑनलाईन ट्रेनिंग

संशयित चोरटा प्रशांत करोशी एकटाच घरफोडी करीत होता. बंगल्याच्या वरील मजल्यावर जाण्यासाठी, उतरण्यासाठी कोणते साहित्य लागते, उंचीवर कसे जायचे व उतरायचे, याची माहिती त्याने ऑनलाईन रोप क्‍लायम्बिंगची प्रात्यक्षिके पाहून उपयोगात आणल्याचा धक्‍कादायक खुलासा त्याने केला.