Wed, Apr 24, 2019 08:19होमपेज › Kolhapur › दैव बलवत्तर... साक्षात मृत्यूच्या दाढेतून सुटका!

दैव बलवत्तर... साक्षात मृत्यूच्या दाढेतून सुटका!

Published On: May 23 2018 1:07AM | Last Updated: May 23 2018 12:58AMकोल्हापूर : दिलीप भिसे

चार राऊंड लोडेड पिस्तूल त्याने रोखले... चिंट्यानंतर आता तुझाच नंबर असे बरळत मारेकर्‍याने पिस्तूलचे ट्रिगर दोनदा खेचले... केवळ आवाज झाला... क्षणार्धात घाम फुटला...डोळ्यासमोर आंधारी आली... मृत्यूच्या भीतीने थरकाप उडाला... तरीही दैव बलवत्तर... मिसफायर झाल्याने जीव वाचला... मृत्यूच्या दाढेतून सुटका झाली... अन्यथा जीवनाचा शेवटच झाला असता...
मद्यधुंद अवस्थेत दहशतीचा थरार काय असतो? मित्र प्रतीक पोवारचा डोळ्यादेखत जीव घेणार्‍या प्रतीक सरनाईककडून अनुभवलो... स्वत:वरील नियंत्रण हरविलेल्या मारेकर्‍यासमवेत दहा तासाचे थरारनाट्य प्रत्यक्षात अनुभवलो, त्याचा प्रत्यंतर सहकारी मित्रांच्या  वाट्याला येऊ नये, अशी अपेक्षा सागर सोमलिंग कांबळे (वय 27, रा. शांतादुर्ग कॉलनी, पाचगाव) या अपहरण तरुणाने दै.‘पुढारी’शी बोलताना व्यक्‍त केली.

जरगनगर येथील मध्यवर्ती चौकात दोन दिवसांपूर्वी थरारनाट्य घडले. एकेकाळी जिवाभावाचे सहकारी असलेल्या पोवार-सरनाईक यांच्यात धुमसणारी दुश्मनी रविवारी रात्री उफाळून आली.  अण्णा ग्रुप कट्ट्याजवळ सरनाईकने पिस्तुलातून डोक्यात गोळ्या झाडून पोवारचा शेवट केला.अमानुष घटनेनंतर प्रत्यक्षदर्शी व पोवारचा मित्र सागरला जिवे मारण्याची धमकी देत मारेकर्‍याने त्याचे जरगनगर येथून अपहरण केले होते. संपूर्ण थरारनाट्याचा साक्षीदार सागरला दहा तासानंतर मारेकर्‍याने प्रतिभानगर येथील रेड्याच्या टकरीजवळ सोडले. पोलिस तपासात खुनाच्या कटात सागरचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग नसल्याचे निष्पन्‍न झाले आहे.

भेदरलेल्या अवस्थेत सागर म्हणाला, महापालिकेच्या निवडणुकीत पोवार व सरनाईक यांच्यात मतभेद झाले.अखेरपर्यंत दोघांची मने जुळलीच नाही. दोघांनी एकत्रित येण्याऐवजी तेढ निर्माण करण्याचेच प्रयत्न झाले. अलीकडे तर ते एकमेकांचे पक्के वैरी बनले होते. रविवारी सर्वजण रात्री चौकात थांबलो होतो. थोड्या वेळाने सरनाईक, त्यानंतर चिंटू व आपण दुचाकीवरून आलो. दोघांनी एकमेकांकडे खुन्‍नस दिली. सरनाईक मद्यधुंद स्थितीत जाणवल्याने चिंटूसह आपण तेथून निघून गेलो. काही अंतरावरून पुन्हा दोघेजण चौकात आलो. त्यानंतर वादावादी, गळपट्टी अन् गोळीबार...   चिंटू रक्‍ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर सरनाईकने मला टार्गेट केले. माझ्यावर पिस्तूल रोखली. तुला सोडणार नाही, अशी धमकी देत दुचाकीवर बसण्यास भाग पाडले. संभाजीनगरच्या दिशेने दुचाकी पळविली. सरनाईक वाटेत दोन ठिकाणी थांबला. पुन्हा त्याने बिनपाण्याची ढोसली. 

 ट्रिगल ओढताच बोबडी वळली !

‘डोक्यात गोळ्या झाडून तुलाही संपवेन’ अशी सरनाईकने धमकी दिल्याने गर्भगळीत झालो होतो. संभाजीनगर वळणावर उडी टाकून पलायनाचा बेत केला. हालचाल लक्षात येताच शिवीगाळ करीत त्याने दुचाकी अंधारात नेली.तेथे डोक्याला पिस्तूल लावले अन् ट्रिगर ओढले.फक्‍त आवाज झाला. पण गोळी सुटली नव्हती. आवाजाने अंग थरथरू लागले. शरीरातील त्राण संपले होते. बोबडी वळली होती. पण मिसफायर झाल्याचे लक्षात आल्यानंतर जीव भांड्यात पडला.

 मध्यरात्रीला नेत्यासह  नातेवाईकाचे घर गाठले !

सरनाईकने मंगळवार पेठ येथील नातेवाईकाचे घर गाठले. तेथून एका नेत्याचे घर गाठले.पण कोणीही भेटले नाहीत. रात्रभर फिरण्यापेक्षा कोठे तरी मुक्‍काम करण्यासाठी पुन्हा दुसर्‍या नातेवाईकाचे घर गाठले.त्यांनी तर दरवाजाच उघडला नाही. मध्यरात्र झाली. सुभाष रोडवरील हुतात्मा गार्डन गाठले. एका बाकड्यावर बसलो. माझी तर झोपच उडाली होती.

दुसर्‍यांदा ट्रिगर ओढूनही जीवदान 

मी पळून जाईन, या भीतीपोटी त्याने गार्डनमध्येच गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याने पुन्हा भयभीत झालो. शिव्या देत त्याने पुन्हा पिस्तूल कानाजवळ लावले. पुन्हा ट्रिगर खेचला...आवाज झाला. दुसर्‍यांदा जीवदान मिळाले... डोळे मिटून बाकड्यावर पडलो...

मारेकर्‍याने केली दहा तासानंतर सुटका !

सकाळी सहा वाजल्यानंतर गार्डनमध्ये वर्दळ सुरू झाली. दुचाकी मित्राकडे सोपवून प्रतिभानगरच्या दिशेने चालत निघालो. रेड्याच्या टकरीजवळ आलो. तेथे काहीकाळ थांबलो. सकाळी 10 वाजता सरनाईकने मला सोडले. सार्‍या घटनेमुळे शरीरात ताकद उरली नव्हती. कसा बसा मित्रांना गाठले. त्यांच्या मदतीने पोलिस अधिकार्‍यांच्या संपर्कात आल्याचेही सागरने सांगितले.