Mon, Jul 15, 2019 23:39होमपेज › Kolhapur › डॉ. डी. वाय. पाटील ज्ञानाचा प्रकाश देणारे देव

डॉ. डी. वाय. पाटील ज्ञानाचा प्रकाश देणारे देव

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

शिरोळ/जयसिंगपूर : प्रतिनिधी

तंत्रज्ञानातील स्पर्धेमुळे जगाचे स्वास्थ्य नष्ट झाले आहे. प्रगतीतून माणसाचाच संहार, मनुष्यहानी होणार असेल तर त्या तंत्रज्ञानाचा विचार   झाला पाहिजे. अशा परिस्थितीत डॉ.डी.वाय.पाटील यांनी शिक्षण संस्थेतून सद्गुणांचा गुणाकार झाला पाहिजे आणि दुर्गुणांची वजाबाकी झाली पाहिजे हा दृष्टिकोन ठेवला. नावाप्रमाणेच ते लाखो विद्यार्थ्यांना ज्ञानाचा प्रकाश देणारे देव असून खर्‍या अर्थाने त्यामध्ये ते यशवंत ठरले आहेत, असे गौरवोद्गार माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी  काढले. 

शिरोळ येथे दत्त सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर रविवारी स्व. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते देऊन  डॉ.डी.वाय.पाटील यांना गौरविण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. शाल, श्रीफळ, मानपत्र, स्मृतिचिन्ह व 1 लाख 11 हजार 111 रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. 

प्रतिभाताई पाटील म्हणाल्या,  शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे डॉ.डी.वाय.पाटील यांनी ओळखले. ते अध्यात्मिक आहेत. त्यांनी त्यांच्या अंतरात्म्याची ताकद ओळखली म्हणून त्यांनी हिमालयाएवढे मोठे काम केले. एवढे करूनही त्यांच्यात कुठेही दंभ, अहंकार नाही. त्यांचे कार्य अष्टपैलू आहे. 

त्या म्हणाल्या, स्व.सा.रे.पाटील यांचे कार्यही उत्तुंग होते. सहकार, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे कार्य गतिमान होते. ते देहवादी, त्यागी, व्यवहारी होते. साहित्य आणि कला यामध्ये त्यांना रस होता. सहकारामध्ये त्यांनी प्रचंड काम केले.  त्यांनी कामातून मोठा वारसा निर्माण करून ठेवला आहे. ते जपण्याचे काम आज गणपतराव पाटील करीत आहेत. 

सत्काराला उत्तर देताना डॉ. डी.वाय.पाटील म्हणाले, अपघाताने कोणत्याही गोष्टी घडत नसतात. मी राज्यपाल झालो म्हणजे मोठा झालो नाही. प्रतिभाताई व सोनिया गांधी यांच्यामुळेच मी विविध राज्यांचा राज्यपाल झालो. 11 वर्षे मी आमदार होतो. मात्र राजकारणाव्यतिरिक्त काहीतरी करावे म्हणून मी ते क्षेत्र सोडून शिक्षण संस्था काढली. मला माझ्या कामात स्व.वसंतदादा पाटील यांची मोलाची मदत झाली. त्यामुळे माझ्या शिक्षण संस्था देशातच नव्हे तर देशाबाहेर पोहचल्या. 

ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार म्हणाले, आज देशात राजकारणातून दुहीकरण, सत्ता स्थानातून धर्मांधता, समाजात जात्यांधता सुरू आहे.  आज राजकारणात बुवा आणि बाबांनी प्रवेश केला आहे.  देशामध्ये देशद्रोही ही शिवी लोकप्रिय होत आहे. बोलणार्‍यांना आणि विचारवंताना ठार मारले जात आहे. याच्याएवढे मोठे दुर्दैव नाही.

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचेही भाषण झाले. स्वागत ‘दत्त’चे अध्यक्ष गणपतराव पाटील, प्रास्ताविक  विनोद शिरसाठ तर डॉ.डी.वाय.पाटील यांच्या जीवन परिचय बाळ महाराज यांनी करून दिला. सीमा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. आभार बंडा माने यांनी मानले.  

कार्यक्रमास  खा. राजू शेट्टी, कल्लाप्पाण्णा आवाडे, आ. सतेज पाटील, आ.उल्हास पाटील, निवेदिता माने, आ. राजू कागे, अशोकराव कोळेकर, राजेंद्र पाटील-यड्रावकर, प्रकाश आवाडे, कोल्हापूरच्या महापौर स्वाती यवलुजे, नगराध्यक्ष डॉ.निता माने,  अण्णासाहेब डांगे, रजनी मगदूम,  काकासाहेब पाटील, रावसाहेब पाटील-बोरगांवकर, गोपाळ पाटील, अशोकराव माने, अनिलराव यादव, नगराध्यक्ष जयराम पाटील  आदी उपस्थित होते. 

Tags : kolhapur, Pratibhatai Patil 


  •