Tue, Jun 25, 2019 15:09होमपेज › Kolhapur › आ. हसन मुश्रीफ यांना मातृशोक

आ. हसन मुश्रीफ यांना मातृशोक

Published On: Jan 12 2019 1:32AM | Last Updated: Jan 12 2019 1:46AM
कागल : प्रतिनिधी

माजी जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादी काँगे्रसचे प्रदेश उपाध्यक्ष, जिल्हा बँकेचे अध्यक्ष, आ. हसन मुश्रीफ यांच्या मातोश्री सकीनाबी मियालाल मुश्रीफ (वय 92) यांचे शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात आ. मुश्रीफ यांच्यासह सेवानिवृत्त पोलिस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ, प्रगतशील शेतकरी अन्वर मुश्रीफ अशी तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे. सकीनाबी मुश्रीफ यांच्या निधनाचे वृत्त समजताच आ. मुश्रीफ यांच्या सांत्वनासाठी जिल्ह्यातून दिवसभर मोठ्या संख्येने नेते, कार्यकर्ते कागलमध्ये दाखल झाले होते. सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेला विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी गर्दी झाली होती. मुस्लिम जमीयत कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्यात आला. दरम्यान, कागल शहरातील सर्व व्यवहार दिवसभर बंद ठेवून श्रद्धाजंली वाहण्यात आली.

आ. हसन मुश्रीफ, सेवानिवृत्त पोलिस महानिरीक्षक शम्मशुद्दीन मुश्रीफ यांना घडविण्यामध्ये मातोश्री सकीनाबी यांचा मोठा वाटा होता. आ. मुश्रीफ यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर मातोश्रींनी मोठ्या कष्टाने आणि धीराने मुलांचा सांभाळ केला. त्यांना तीन मुले आणि अम्माबी बाबासो मुजावर (कोल्हापूर), खुर्शद मिरअहमद मुजावर (कोल्हापूर), आणि जमेला कमरुद्दीन शरीफ मसलत (मिरज) अशा तीन मुली आहेत. मातोश्री सकीनाबी यांचे मूळ गाव मिरज. आ.  मुश्रीफ यांचे वडील मियालाल मुश्रीफ कागल नगरपालिकेचे पहिले लोकनियुक्त उपनगराध्यक्ष व प्रगतशील शेतकरी होते.

आ. मुश्रीफ यांच्या मातोश्रींच्या निधनाचे वृत्त समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केद्रीय मंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, सुनील तटकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह राज्यभरातील अनेक नेते, प्रमुख कार्यकर्त्यांनी त्यांचे दूरध्वनीवरून सांत्वन केले. दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी आ. मुश्रीफ यांच्या मातोश्रींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले व आ. मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयाचे सांत्वन केले.

दफनभूमीत झालेल्या शोकसभेत कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार के. पी. पाटील, किसन कुराडे, डी. डी. चौगुले, माजी आमदार वीरकुमार पाटील, माजी मंत्री भरमू सुबराव पाटील, महापौर, उपमहापौर, माजी आमदार काका पाटील, भैया माने, शामराव पाटील, प्रवीण काळबर यांनी भावना व्यक्त केल्या. यावेळी विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्तेदेखील मोठ्या प्रमाणात सांत्वनासाठी आले हेाते.