Mon, Jun 24, 2019 21:27होमपेज › Kolhapur › ब्लॉग : महाडिक काका-पुतण्यांचे संधीसाधू राजकारण?

ब्लॉग : महाडिक काका-पुतण्यांचे संधीसाधू राजकारण?

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 11 2018 1:33AMकोल्हापूर : विठ्ठल पाटील

जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आठवडाभरातील घडामोडींमुळे माजी आमदार महादेराव महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक या काका-पुतण्यांचे राजकारण चर्चेत आले आहे. कागलच्या कुरूक्षेत्रात आमदार हसन मुश्रीफ यांना नेस्तनाबूत करण्याची घोषणा महादेवराव महाडिक यांनी केली, तर त्यांचे पुतणे खासदार धनंजय महाडिक यांनी मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली लढणार, असे जाहीर केले. त्यामुळे या काका-पुतण्यांचे राजकारण संधीसाधू समजायचे काय, अशी चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.

महाभारतापासून आतापर्यंत काका-पुतण्यांचे राजकारण नेहमीच चर्चेत राहिले आहे. राज्यात पवार तसेच मुंडे तर कोल्हापूर जिल्ह्यात महाडिक काका-पुतण्यांचे राजकारण सर्वश्रुत आहे. महाभारतातील कर्ण आणि घटोत्कच हे काका-पुतणे एकमेकाविरोधात लढले. तो अनुभव गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडेंच्या बाबतीत आला; पण शरद पवार व अजित पवार यांनी एकीने राजकीय युद्ध लढले. तोच प्रकार महादेवराव महाडिक आणि धनंजय महाडिक यांच्याबाबतीत कोल्हापूरने अनुभवला. कोल्हापूरच्या राजकारणावर आपली पकड कायम राहावी, यासाठी महादेवराव महाडिक यांनी आतापर्यंत अनेकांविरोधात दंड थोपटले. 

आपण काँग्रेसचे खंदे कार्यकर्ते असल्याचे सांगणार्‍या महाडिक यांनी मात्र संधीसाधू राजकारण केल्याचा आरोप त्यांच्यावर अनेकदा झाला. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसमधून निलंबित असणारे महादेवराव महाडिक भाजपसोबत आहेत. इतकेच नव्हे तर त्यांचे चिरंजीव अमल महाडिक भाजपचे आमदार आणि सून शौमिका अमल महाडिक जिल्हा परिषदेत भाजपच्याच अध्यक्षा आहेत. पुतणे धनंजय महाडिक राष्ट्रवादीचे खासदार आहेत. महाडिक कुटुंबीयांची ही राजकीय पार्श्‍वभूमी पाहता महादेवराव महाडिक यांनी राजकीय हयातीत जिल्ह्यातील अनेक नेत्यांना खेळविल्याची टीकाही त्यांच्यावर झाली. शिरोळ, हातकणंगले, करवीर तालुक्यासह कोल्हापूर शहर ही त्यांच्या राजकारणाची प्रमुख केंद्रे ठरली. त्यांना विरोध झालेला कधीच आवडला नाही, असेही जुने कार्यकर्ते सांगतात. त्यामुळेच महाडिक यांचे खानविलकर यांच्यापासून अलीकडे आमदार सतेज पाटील यांच्याबरोबर राजकीय वैरत्व चांगलेच रंगले. 

लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली. त्यावेळी प्रबळ उमेदवार म्हणून हसन मुश्रीफ यांनी धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादीत आणून उमेदवारी दिली. महाडिक कुटुंबीयांसमवेत सतेज पाटील यांचे असलेले राजकीय वैरत्व जाचक ठरेल, या भावनेतून मुश्रीफ यांनी प्रयत्न करून सतेज व धनंजय यांचे मनोमिलन केले. पुढे येणार्‍या विधानसभेला कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात महाडिक यांनी पाटील यांना मदत करायचे असेही त्यावेळी ठरले; पण तो शब्द महाडिक यांच्याकडून पाळला गेला नाही. उलट पाटील यांच्याविरोधात अमल महाडिक ठाकले आणि आमदार झाले. ही बाब पाटील यांच्यापेक्षा मुश्रीफ यांच्या जिव्हारी लागली आणि पाटील यांचा पैरा फेडण्यासाठी कायपण करू, असे मुश्रीफ यांनी जाहीर केले.

मुश्रीफ यांची सतेज पाटील यांच्याशी वाढलेली जवळीक महाडिक यांना अस्वस्थ करू लागली. अशातच पाटील यांनी गोकुळविरोधात मोर्चा काढून रान उठविण्यास सुरुवात केली. त्यामुळे महादेवराव महाडिक अधिकच चिडले आणि प्रतिमोर्चा काढून आव्हान दिले. पाटील आणि महाडिक यांच्या राजकीय वैरत्वात मुश्रीफांनी पाटील यांच्या बाजूने झुकते माप दिल्याचे निदर्शनास येताच महाडिक यांनी मुश्रीफ यांना आव्हान देण्यास सुरुवात केली. महापालिका निवडणुकीपासून धनंजय महाडिक आणि मुश्रीफ यांचेही बिनसले होते. दोघेही पक्षाचे खासदार आणि आमदार असताना एकमेकांपासून दूर झाले होते. त्यांच्यातील दरी इतकी वाढली की मुश्रीफ यांनी येत्या लोकसभेला प्रा. संजय मंडलिक यांना खासदार करणारच, असे जाहीर केले. मंडलिक हे धनंजय महाडिक यांच्याविरोधात 2014 लढले होते. मुश्रीफ यांनी थेट धनंजय महाडिक यांनाच आव्हान दिल्याने पुन्हा महाडिक विरुद्ध मुश्रीफ असे चित्र निर्माण झाले. अशातच रविवारी बालिंगा येथे दोघे एका व्यासपीठावर आले आणि तेथेच धनंजय महाडिक यांनी मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे जाहीर केले. 

एकूणच या घडामोडी पाहता महाडिक काका-पुतण्यांचे चाललेय काय, असाच प्रश्‍न राजकीय वर्तुळाला पडला आहे. महादेवराव महाडिक यांनी मुश्रीफ यांना नेस्तनाबूत करण्याचा इशारा दिला असतानाच धनंजय महाडिक यांनी अचानक यू टर्न घेत मुश्रीफ यांचे नेतृत्व मान्य केले आहे. म्हणूनच महाडिक कुटुंबीयांचे राजकारण नेमके कोणत्या वळणावर आहे, याचाच अभ्यास राजकीय विश्‍लेषकांतून सुरू आहे.

Tags : Kolhapur, Former, Maharashtra, MLA, Mahadev Mahadik, MP, Dhananjay Mahadik,  politics, uncle, nephew