Fri, Mar 22, 2019 23:53होमपेज › Kolhapur › नोटाबंदी, जीएसटीच्या चुकीच्या कार्यवाहीने अर्थव्यवस्था कोलमडली : चिदम्बरम

नोटाबंदी, जीएसटीच्या चुकीच्या कार्यवाहीने अर्थव्यवस्था कोलमडली : चिदम्बरम

Published On: Jun 04 2018 6:03PM | Last Updated: Jun 04 2018 6:26PMकोल्हापूर : प्रतिनिधी

केंद्र सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय, जीएसटीची चुकीची अंमलबजावणी, बँकांवर लादलेली आर्थिक धोरणे ही देशाची आर्थिक व्यवस्था कोलमडण्यास कारणीभूत आहेत, असे मत माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी व्यक्त केले. उद्योगांना कर्जाची उपलब्धता होत नाही, शेतकरी आत्महत्या वाढत चालल्या आहेत, इंधनाचे भरमसाट दर वाढत असून, जनतेला महागाईच्या खाईत लोटणार्‍या या सरकारने कोणासाठी अच्छे दिन आणले, असा सवाल त्यांनी केला. कोल्हापूर चेम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्या वतीने केशवराव भोसले नाट्यगृह येथे आयोजित ‘राष्ट्रीय अर्थव्यवस्था सद्यस्थिती व परिणाम’ या विषयावर ते बोलत होते.

देशाच्या अर्थव्यवस्थेवर मी समाधानी नाही, तरीही मला त्याविषयी बोलावे लागते, असे सांगून चिदम्बरम म्हणाले, काँग्रेस आघाडी सरकारची सत्ता गेल्यानंतर या देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट करणार, असा दावा भाजप आघाडी सरकारने केला. त्यामुळे या सरकारकडून जशा देशातील जनतेच्या अपेक्षा होत्या, तशा एक माजी अर्थमंत्री म्हणून माझ्याही होत्या; पण भाजपप्रणीत सरकारने आर्थिक विकासाला चालना देणारे एकही धोरण राबवले नाही. काँग्रेस सरकारच्या काळातील आर्थिक विकासाच्या दरातही मोठी घट झाली आहे. 2005 च्या काळात देशाचा आर्थिक विकास दर हा 8.5 टक्के होता. 2009 नंतर तो 7.5 टक्के झाला. भाजपप्रणीत सरकारच्या काळात तो 5.7 टक्क्यांवरून काही काळ 7.2 व नंतर 7.4 टक्के इतका झाला.

देशाच्या विकास दरात आता वाढ होईल असे वाटत असताना, सरकारने नोटा बंदीचा निर्णय घेतला. यातून काळा पैसा बाहेर येईल, असे सांगण्यात आले; पण प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. काश्मीरमधील दहशतवाद संपला नाही. भ्रष्टाचार सुरूच आहे.  याउलट अनेक लहान उद्योग बंद पडले, कामगार बेरोजगार झाले. शेतकर्‍यांच्या हातात पैसा राहिला नाही. रिझर्व्ह बँक अजूनही सांगते नोटा बंदीच्या काळातील पैशाची मोजणी सुरू आहे. नोटा बंदीनंतर देशाचा आर्थिक विकास दर 5.5 टक्क्यांवर आला होता, आता तो 6.7 टक्क्यांवर आहे; पण यामुळे अर्थव्यवस्थेतील झालेली घसरण ही पुन्हा न वधारण्याजोगी आहे, असे चिदम्बरम यांनी सांगितले.

गब्बर सिंग टॅक्स (जीएसटी)

नोटा बंदीबरोबरच जीएसटी करप्रणालीची अंमलबजावणी हा दुसरा चुकीचा निर्णय सरकारने घेतल्याचे सांगून चिदम्बरम म्हणाले, 2006 साली जीएसटी कर लागू करण्याबाबतची भूमिका मांडली; पण या कराला गुजरात व मध्य प्रदेश या दोन राज्यांनी विरोध केला. वरिष्ठांचा आदेश म्हणून विरोध करत असल्याचे कारण त्यांनी सांगितले. आम्ही जीएसटीमध्ये एकच करप्रणाली लागू करा व 15 ते 18 टक्के इतकाच कर सर्व वस्तूंवर असावा, असे मत मांडले होते; पण भाजप सरकारने 0 टक्क्यापासून 40 टक्क्यांपर्यंत जीएसटी कर लागू केल्याने मूळ कल्पनेला छेद दिला आहे. जीएसटी कर समजावून घेण्यासाठी तो राज्यांच्या सर्व भाषेत असणे गरजेचे असताना केवळ इंग्रजीमध्ये हा कायदा करण्यात आला आहे. त्यामुळे सामान्य व्यापारी व उद्योजकांना अजूनही हा कर समजला नाही; पण आपल्या मानगुटीवर बंदूक ठेवून हा कर वसूल केला जात आहे, त्यामुळे हा गब्बर सिंग टॅक्स आहे, अशा शब्दांत त्यांनी जीएसटी कराची खिल्ली उडवली.

बँकिंग व्यवस्था अडचणीत

2004 साली देशातील बँकांचे  एनपीएचे प्रमाण 4.6 टक्के इतके होते. बँकिंग क्षेत्रात त्या काळात अडचणी होत्या, आजही त्या आहेत हे मान्य; पण त्या सोडवण्यासाठी योग्य धोरणांचा अवलंब केला पाहिजे, असे सांगून चिदम्बरम म्हणाले, केवळ केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बँकिंग व्यवस्था अडचणीत आली आहे, बँकांचे एनपीएचे प्रमाण 11 टक्क्यांवर गेले आहे. कर्जबुडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. नीरव मोदी, विजय मल्ल्या यांच्यासारख्या मोठ्या कर्जदारांना देशातून पळून जाण्यास या सरकारने मदत केली.त्यामुळे बँका अडचणीत आल्या आहेत.  लहान थकबाकीदारांवर बँका दबाव आणून कर्जवसुली करत आहेत. ऊर्जा, स्टील, कोळसा या क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्यास कोणी येत नाही. त्यामुळे बाजारपेठेत चलनवाढ अपेक्षेप्रमाणे होत नसल्याचे चित्र आहे.

महागाईला खतपाणी

इंधन दरवाढीने सामान्य जनता बेजार झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑईलचा दर 78 डॉलर प्रतिबॅरल आहे. काँग्रेसचे सरकार असताना हा दर 105 डॉलर प्रतिबॅरल होता. तेव्हा आतासारखी इंधनवाढ नव्हती. कच्चा मालाच्या किमती कमी होऊनही देशातील इंधनाचे दर वाढतच आहेत, हा विरोधाभास आहे. सरकारने इंधनावर पुन्हा अतिरिक्त कर लावून महागाईला खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला असल्याचे चिदम्बरम म्हणाले. हे सरकार केवळ चुकीचे आकडेवारी सांगून अनेक गोष्टी मॅनेज करते; पण देशाची अर्थव्यवस्था मॅनेज करता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

स्वागत चेम्बर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले. प्रास्ताविक आनंद माने यांनी केले.सूत्रसंचालन योगेश कुलकर्णी यांनी केले, तर आभार संजय शेटे यांनी मानले. या कार्यक्रमास महापौर शोभा बोंद्रे, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी.पाटील, आ. सतेज पाटील, शरद रणभिसे, प्रल्हाद चव्हाण, उपमहापौर महेश सावंत, व्यापारी, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.