Wed, Nov 14, 2018 16:38होमपेज › Kolhapur › मुंबईत राज्यातील पहिले विदेश भवन

मुंबईत राज्यातील पहिले विदेश भवन

Published On: Jan 16 2018 2:10AM | Last Updated: Jan 16 2018 1:39AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

परदेशात जाण्यासाठी आवश्यक गोष्टींची माहिती मिळावी, यासाठी प्रत्येक राज्यात विदेश भवन उभारले जाणार आहे. एक खिडकी योजनेच्या माध्यमातून याचे कामकाज चालणार आहे. ऑगस्ट महिन्यात मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे राज्यातील पहिले विदेश भवन सुरू करणार असल्याचे भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार खात्याचे सचिव ज्ञानेश्‍वर मुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

कोल्हापूर प्रेस क्‍लब आयोजित वार्तालाप कार्यक्रमात त्यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. मुळे म्हणाले, देशभर पासपोर्टची प्रक्रिया सुलभ केली असून, 50 कि.मी.च्या आत पासपोर्ट मिळेल, अशाप्रकारचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. देशात 259 नवीन पासपोर्ट कार्यालयांपैकी 60 कार्यालये उघडली असून, उर्वरित दोन महिन्यांत सुरू होतील. पासपोर्ट वितरणात कोल्हापूर अव्वल आहे. तीन वर्षांत 90 हजारांहून अधिक नागरिकांना दुबई, आबुधाबी, मलेशिया, सौदी अरेबिया या ठिकाणांहून सोडवून आणले आहे. यात इतर 45 देशांतील नागरिकांचाही समावेश आहे. भारताने 35 देशांबरोबर एक्स्ट्रीडिशन करार केला आहे. त्यानुसार सरकारच्या परवानगीने एका देशातून दुसर्‍या देशात गुन्हेगारांना आणले जात आहे. 3 कोटी 11 लाख भारतीय नागरिक नोकरीसाठी विदेशात आहेत, यात सर्वाधिक अमेरिकत 40 लाख भारतीय आहेत. 

परदेशात जाणारे नागरिक व त्यांना पाठविणारे नोंदणीकृत एजंटांसाठी आगामी काळात प्रशिक्षण देण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याच्या माध्यमातून शंभर नागरिकांना प्रायोगिक तत्त्वावर प्रशिक्षण दिले जाणार आहे. 26 जानेवारीनंतर मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बंगळूर येथे ही सेवा सुरू केली जाणार आहे. बेळगाव प्रश्‍नाबद्दल विचारले असता, हा प्रश्‍न न्यायालयीन प्रक्रियेत असून, यावर शांततेच्या मार्गातून तोडगा निघेल, असेही ते म्हणाले. 

‘एनआरआय’ मंत्रालय हवे

बहुतेक राज्यांनी ‘एनआरआय’ पॉलिसी जाहीर केली असून, त्यांची स्वतंत्र ‘एनआरआय’ मंत्रालये आहेत. महाराष्ट्रात ‘एनआरआय’ मंत्री नाही. राज्यातही हे मंत्रालय सुरू होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे ते म्हणाले.