Sun, May 26, 2019 09:39होमपेज › Kolhapur › ‘जर्मनी’ टोळीवर दुसर्‍यांदा ‘मोका’ची कारवाई

‘जर्मनी’ टोळीवर दुसर्‍यांदा ‘मोका’ची कारवाई

Published On: Aug 18 2018 1:21AM | Last Updated: Aug 18 2018 1:11AMइचलकरंजी : वार्ताहर

इचलकरंजी शहरात दहशत माजवणार्‍या तसेच खून, खुनाचा प्रयत्न, चोरी आदींसह विविध गुन्हे दाखल असलेल्या जर्मनी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळीचा म्होरक्या अल्पवयीन आहे. 

कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये त्याच्यासह संतोष ऊर्फ ऋषा बाळू बाबर (वय 20, रा. आभारफाटा), किरण ऊर्फ किय्या आप्पासो वडर (वय 20, रा. जयभीमनगर), सोहेल शिराज शेख (वय 21, रा. कोरोची), अक्षय बबन कल्ले (वय 20, रा. शहापूर), विद्यासागर ऊर्फ राजेश ऊर्फ लाजा नामदेव चव्हाण (वय 24, रा. भाटले मळा, दत्तनगर) व असिफ महंमद शेख (वय 20, रा. दत्तनगर) अशा सात जणांचा समावेश आहे. जर्मनी टोळीवरील ‘मोकां’तर्गत करण्यात आलेली ही दुसरी कारवाई आहे. एकाच टोळीवर दोन वेळा ‘मोकां’तर्गत कारवाई होण्याची ही शहरातील पहिलीच घटना आहे. 

अल्पवयीन म्होरक्या असलेल्या तसेच त्याच्या भावाचाही समावेश असणार्‍या जर्मनी टोळीने गेल्या काही वर्षांपासून इचलकरंजी शहरात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. अविनाश शेखर जाधव ऊर्फ जर्मनी याच्यासह त्याच्या टोळीतील आकाश भिलुगडे, नईम कुकुटनूर, मनोज शिंगारे, बजरंग फातले, प्रशांत काजवे यांच्यासह अल्पवयीन संशयितावर यापूर्वी मोकांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. हे सर्व जण सध्या कारागृहात आहेत, तर सुधारगृहात रवानगी करण्यात आलेला अल्पवयीन म्होरक्या कोल्हापुरातील बालसुधारगृहातून पळाला होता. त्यानंतर त्याने पुन्हा खून, खुनाचा प्रयत्न आदींच्या माध्यमातून शहरात दहशत माजवण्यास सुरुवात केली होती. त्यातच टोळीत सामील होण्यास नकार दिल्याच्या कारणातून 23 जुलै रोजी गुंड रामा कचरू गरड याचा अल्पवयीन म्होरक्यासह संतोष बाबर, असिफ शेख, राजेश चव्हाण, किरण वडर, सुहेल शेख व अक्षय कल्ले या त्याच्या साथीदारांनी खून केल्याचे उघडकीस आले होते. पोलिसांनी या सर्वांच्या मुसक्या आवळल्या होत्या. 

अल्पवयीन संशयिताची पुन्हा बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे, तर उर्वरित सर्व जण कारागृहात आहेत. या 7 जणांविरोधातील ‘मोकां’तर्गत कारवाईचा प्रस्ताव प्रभारी पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे सादर केला होता. त्याला मंजुरी देण्यात आली असून, या टोळीवर ‘मोकां’तर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गावभागचे निरीक्षक प्रदीप काळे यांनी दिली. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

शहरातील दहावी कारवाई 

इचलकरंजी शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे व उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी ‘मोका’ कारवाईचा धडाका लावला आहे. ‘मोकां’तर्गत शहरातील ही 10 वी, तर जिल्ह्यातील 13 वी कारवाई ठरली आहे. याचा गुन्हेगारांनी चांगलाच धसका घेतला आहे.