Sun, Jul 21, 2019 00:23होमपेज › Kolhapur › बिद्रेंचा मृतदेह शोधासाठी घेणार इराकची मदत

बिद्रेंचा मृतदेह शोधासाठी घेणार इराकची मदत

Published On: Apr 16 2018 10:14PM | Last Updated: Apr 17 2018 2:31AMकोल्हापूर : दिलीप भिसे

सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिद्रे-गोरे यांचा अमानुष खून करून मीरा-भाईंदर खाडीत फेकून देण्यात आलेल्या मृतदेहाच्या तुकड्यांच्या शोधासाठी तपास यंत्रणा आता इराकची मदत घेणार आहे. ‘डीएक्स 300 ड्रायव्हर हेल्ड मॅग्‍नेटोमीटर’ अत्यंंत दुर्मीळ उपकरणाचा त्यासाठी वापर करण्यात येणार आहे. जगात इराककडेच हे उपकरण उपलब्ध आहे, असा वरिष्ठ सूत्रांचा दावा आहे. दरम्यान, उपकरणाच्या वापरासाठी शासनाने मंजुरी दिली आहे.

आळते (जि. कोल्हापूर) येथील मूळच्या महिला अधिकारी बिद्रे-गोरे यांचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी वूडकटरने मृतदेहाचे तुकडे करून मुख्य संशयित व निलंबित पोलिस अधिकारी अभय कुरूंदकर, महेश फळणीकरसह साथीदारांनी मीरा-भाईंदरच्या खाडीत फेकून दिल्याचे तपास यंत्रणेच्या चौकशीत निष्पन्‍न झाले आहे.

मृतदेहाचे तुकडे शोधण्यासाठी नौदल, तटरक्षक दलाच्या मदतीने प्रयत्न झाले. ओशियन सायन्स सर्व्हिसिंग प्रा. लि. कंपनीच्या माध्यमातून अद्ययावत ‘ग्रॅडिओमीटर’च्या सहाय्याने खाडीत शोधासाठी नऊ पॉईंटही निश्‍चित करण्यात आले आहेत.

हे सर्वच पॉईंट खोल, दलदल, शिवाय काही ठिकाणी विहिरीसारखे खोलवर खड्डे असल्याने अत्याधुनिक उपकरण उपलब्धतेबाबत तपास यंत्रणांना साशंकता होती. ‘डीएक्स 300 ड्रायव्हर हेल्ड मॅग्‍नेटोमीटर’ हे अद्ययावत अत्यंत दुर्मीळ उपकरण केवळ इराककडे उपलब्ध असल्याने परराष्ट्र मंत्रालयाद्वारे इराकशी संपर्क साधण्यात आला आहे. इराकनेदेखील अत्याधुनिक उपकरण देण्याची तयारी दर्शविली आहे, असेही सांगण्यात आले.

हेल्ड मॅग्‍नेटोमीटरमुळे शोधमोहीम सोयीस्कर

ग्रॅडिओमीटर यंत्राद्वारे निश्‍चित केलेल्या पॉईंटच्या पाच मीटर परिघामध्ये खोदकाम करावे लागणार होते. खाडीत पाण्याची खोली जादा प्रमाणात असल्याने हे काम फार अवघड व जिकिरीचे होते. तपास यंत्रणेतील वरिष्ठाधिकार्‍यांत याबाबत वेगवेगळे मतप्रवाह होते. मात्र, हेल्ड मॅग्‍नेटोमीटर उपलब्ध झाल्याने अवघ्या आठ ते नऊ इंचाच्या परिघात अवघ्या एक ते दीड मीटर खोलीवर खोदकाम करावे लागणार आहे.