Thu, Apr 25, 2019 03:26होमपेज › Kolhapur › वनरक्षकांचे वेतनश्रेणीसाठी धरणे

वनरक्षकांचे वेतनश्रेणीसाठी धरणे

Published On: Dec 12 2017 2:05AM | Last Updated: Dec 12 2017 12:10AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

तलाठी आणि मंडल अधिकार्‍यांप्रमाणे वनपाल व वनरक्षकांना वेतनश्रेणी लागू करावी, या प्रमुख मागणीसह अन्य विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वनरक्षक वनपाल संघटनेतर्फे सोमवारी येथील वनविभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कोल्हापूर, सांगली सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनपाल वनरक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिला कर्मचार्‍यांची उपस्थिती लक्षणीय होती.

वनपाल वनरक्षक यांना महसूल प्रमाणे वेतनश्रेणी लागू होती. पाचव्या वेतन आयोगानंतर या कर्मचार्‍यांवर अन्याय करण्यात आला आहे. चौथ्या वेतन आयोगापर्यंत तलाठी, वनरक्षक आणि वनपाल, मंडल अधिकारी अशी समान वेतनश्रेणी होती. मात्र, पाचव्या वेतन आयोगानंतर वनरक्षकांना थेट शिपायाची आणि वनपालांना तलाठ्याची वेतनश्रेणी लागू केली आहे. या कर्मचार्‍यांवर अन्याय होत आहे. याच्या निषेधार्थ कोल्हापुरातील मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन करण्यात आले.

दिवसभर कार्यालयासमोर मंडपात घोषणाबाजी करण्यात आली. या मागणीचे निवेदन मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील यांना देण्यात आले. स्वसंरक्षणासाठी उपाययोजना करा, वनविभागातील आम्ही फिल्डवरील कर्मचारी असल्याने आम्हाला जंगलात भटकावे लागते. अशावेळी आम्हाला रायफल देण्याची तरतूद आहे. असे असताना प्रशासनाने याची अंमलबजावणी केली नसल्याचे आंदोलकांनी सांगितले. मागण्या अशा, गणवेश, रेनकोट, थंडीचे जॅकेट, बूट याची तरतूद करावी, फिरतीसाठी वाहन व्यवस्था करावी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेतनश्रेणीत सुधारणा करावी. 

यावेळी डी. आर. भोसले, पी. जी. पाटील, आर. एस. पाटील, आर. के. देसा, सुरेश चरापले, सागर पाटील, महादेव आंगज, जॉन्सन डिसोझा, जितेंद्र साबळे,  मनीषा कदम यांच्यासह वनपाल वनरक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.