होमपेज › Kolhapur › पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी १७ गावांचे आराखडे

पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी १७ गावांचे आराखडे

Published On: Jan 05 2018 1:14AM | Last Updated: Jan 04 2018 8:40PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

पंचगंगा नदी प्रदूषित करणार्‍या ग्रामपंचायती व इतर निवडक ग्रामपंचायतींमध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनात प्राधान्य देण्यात येणार आहे. अशा 17 ग्रामपंचायतींचे गावकृती आराखडे तयार करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ग्रामपंचायत हद्दीतील खुल्या जागा ताब्यात घेण्यासाठी प्रसंगी ग्रामपंचायतीवर कारवाई करू, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेकडील 2017 मधील विविध विकासकामांची सिद्धी व सन 2018 मधील महत्त्वाचे संकल्प याबद्दल माहिती देताना डॉ. खेमनार म्हणाले, 2 ऑक्टोबर 2016 रोजी जिल्हा हगणदारीमुक्‍त झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. जिल्ह्यात 4 लाख 89 हजार 775 कुटुंबांकडे वैयक्‍तिक शौचालये आहेत. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रांतर्गत जिल्ह्यातील 2002 पैकी 1069 शाळा प्रगत झाल्या आहेत. 1389 शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत. तर 1389 मध्ये ई-लर्निंग सुरू करण्यात आले आहे. 1556 शाळांना ‘अ’ श्रेणी प्राप्त असून स्वच्छ विद्यालयांतर्गत 238 शाळांना 5 स्टार रेटिंग मिळाले आहे.

जिल्हा परिषदेच्या निवासी क्रीडा प्रशालेतील 32 विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर भाग घेऊन 5 सुवर्ण, 2 रौप्य व 5 कांस्यपदके मिळवली आहेत. तर राज्यस्तरावर 30 सुवर्ण, 14 रौप्य व 8 कांस्य मिळविली आहेत. शालेय पोषणआहारअंतर्गत 5 तालुक्यांतील शाळांत 100 टक्के गॅस उपलब्ध आहेत. जिल्हा परिषदेच्या 35 प्राथमिक शाळांना आयएसओ मानांकन प्राप्त आहे. सीएसआरअंतर्गत इंपती फौंडेशन मुंबई यांच्याकडून 8 कोटी 54 लाख, इंडसन बँकेकडून 1 कोटी, तर रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरकडून 22 लाख व घाडगे पाटील इंडस्ट्रीजकडून 15 लाख रुपयांचा निधी आरोग्य स्वच्छता व प्राथमिक शाळा आदी उपक्रमांसाठी मिळाला आहे. 

राज्य ग्रामीण जीवन्‍नोती अभियानांतर्गत 3671 स्वयंसाहाय्यता बचतगटांना 48 कोटी 27 लाख रुपयांचे अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच 936 स्वयंसाहाय्यता बचतगटांना 1 कोटी 43 लाख फिरता निधी उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. पुढील वर्षी  7032 स्वयंसाहाय्यता बचतगटांना 65 कोटी 12 लाख रुपयांचे अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल. 

अंगणवाडी केंद्रातील 6 महिने ते 6 वर्षे वयोगटातील बालके, गरोदर माता आणि स्तनदा माता अशा 2 लाख लाभार्थ्यांना पोषण आहार व घरपोहोच आहार देण्यात आलेला आहे. राज्यसभा खासदार डी. पी. त्रिपाटी यांच्या खासदार निधी मधून जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना 22 लाख रुपयांची हिंदी माध्यमाची पुस्तके मंजूर करण्यात आली आहेत. राष्ट्रीय बायोगॅसमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यासह देशात नेहमीच प्रथम क्रमांकावर असून राज्याच्या एकूण उद्दिष्टापैकी 23 टक्के काम एकट्या कोल्हापूर जिल्ह्याचे आहे. 

राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत 105 वाड्यावस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत, तर मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत 21 गावे, वाड्यांचे कामे हाती घेण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ग्रामीण रस्त्यांसाठीची 122 किलोमीटरची 23 कामे मंजूर करण्यात आली असून त्यासाठी 80 कोटी 98 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 2018 मध्ये सर्व टीबी रुग्णांसाठी पोषण आहार बास्केट ही योजना राबविण्यात येईल, तसेच अंगणवाड्यांना इलेक्ट्रॉनिक वजन काटे पुरविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.