Thu, Jul 18, 2019 21:06होमपेज › Kolhapur › गुडवळेत वाघाच्या हल्ल्यात म्हैस ठार

गुडवळेत वाघाच्या हल्ल्यात म्हैस ठार

Published On: Apr 17 2018 1:53AM | Last Updated: Apr 16 2018 10:39PMचंदगड : प्रतिनिधी

वाघोत्रे, गुडवळे परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून वाघाची दहशत कायम आहे. दरम्यान, रविवारी (दि. 15) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गुडवळे येथील महादेव काशीनाथ पवार यांची गाभण म्हैस वाघाने खाऊन फस्त केली. 

पवार हे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जनावरे चारण्यासाठी वाघोत्रे जंगलानजीक असलेल्या मारुती गावडे यांच्या मालकीच्या शेतात गेले होते. झुडपात चरत असलेल्या म्हशीवर अचानक वाघाने हल्‍ला केला. यावेळी इतर जनावरे घाबरून सैरावैरा घराच्या दिशेने पळत आली. भीतीने पवार यांनीही घर गाठले. दरम्यान, आज (दि. 16) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अर्धवट खाल्‍लेल्या स्थितीत म्हैस आढळली. सुमारे 60 हजारांची गाभण म्हैस वाघाने खाऊन फस्त केल्याने गरीब पवार कुटुंबीयांवर संकट कोसळले. वनविभागाने पंचनामा करून या शेतकर्‍याला नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

दरम्यान, गुडवळे, वाघोत्रे, कणवी या परिसरात अनेकवेळा वाघाचे दर्शन झाले आहे. बर्‍याच वेळा वाघ चंदगड-पारगड रस्त्यावर अनेकांच्या दृष्टीस पडला आहे. या परिसरात कायम वाघाचे दर्शन होत असल्याने सायंकाळी सहा वाजल्यानंतर या रस्त्यावरुन प्रवाशांनी जाणे बंद केले आहे. सायंकाळी 6 वाजताची एसटी गेल्यानंतर हा रस्ता सुनसान असतो. अलिकडे दुचाकीवाले दिवसाही जाण्याचे धाडस करत नाहीत. 

Tags : Kolhapur, past, two, months, tiger,  remained, intense.