कोल्हापूर : प्रतिनिधी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दर वाढीचे आंदोलन शेतकर्यांसाठी नव्हे तर दूध संघांसाठी होते, असा घणाघाती आरोप करत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकर्यांच्या नावावर पैसे जमा करेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असे म्हणणार्या नेेत्यांनी दूध संघाच्या नावावर पैसे जमा करण्याची घोषणा केल्यानंतर आंदोलन मागे का घेतले, असा सवाल केला.
शासनाने जाहीर केलेले प्रति लिटर पाच रुपये शेतकर्यांच्या नावावर जमा करावेत, या मागणीसाठी व पांढर्या दुधातील काळ्या बोक्यांच्या पंक्तीत बसणार्यांंचा शोध घेण्यासाठी रयत क्रांतीच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मंत्री खोत म्हणाले, स्वाभिमानीच्या नेत्यांनी आपण शेतकर्यांचे मसिया आहे अशा अविर्भावात दूध दरवाढीचे आंदोलन सुरू केले. आंदोलन सुरू करत असताना त्यांनी शेतकर्यांंच्या नावावर पैसे जमा झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी घोषणा केली होती, पण प्रत्यक्षात मात्र उलटेच घडले.
दूध दरवाढीच्या नावाखाली केलेले आंदोलन हे केवळ सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारण्यासाठी केले आहे. संघाच्या नावावर रक्कम जमा करण्याच्या निर्णयाने शेतकर्यांचे नुकसान होणार असल्याने त्यांनी यापुढे दूध उत्पादक संघांच्या विरोधात आंदोलन करणे आवश्यक आहे. ती हिंमत त्यांनी दाखवावी, असेही मंत्री खोत म्हणाले.
दूध उत्पादकांना शासनाकडून जाहीर झालेल्या अनुदानाची रक्कम थेट शेतकर्यांच्या नावावर जमा करावी यासाठी रयत क्रांतीच्या वतीने टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात सुरेश सासने यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ येथून करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.