Thu, Aug 22, 2019 08:36होमपेज › Kolhapur › जवानाच्या मदतीमुळे तेऊरवाडीची मुलगी आसामात सापडली

जवानाच्या मदतीमुळे तेऊरवाडीची मुलगी आसामात सापडली

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

चंदगड : प्रतिनिधी

दोन महिन्यांपूर्वी बेपत्ता असलेली तेऊरवाडी येथील भरमू चव्हाण यांची 13 वर्षांची मुलगी चार हजार कि.मी. अंतरावरील आसाममध्ये सापडली. इतक्या लांब मुलगी गेलीच कशी? असा चंदगड तालुक्यातील नागरिकांना प्रश्‍न पडला आहे. दरम्यान, तिचे वडील भरमू चव्हाण तिला घेऊन परतीचा प्रवास करत आहेत. शुक्रवारी (दि. 30) बाप आणि लेक तेऊरवाडी येथे पोहोचणार आहेत. आल्यानंतरच या प्रकरणाचे गूढ उकलणार आहे. 

केवळ दैव बलवत्तर म्हणून अरुणाचल येथे देशसेवा करणार्‍या जवानाने त्या मुलीची आणि तिच्या पालकांची दोन महिन्यानंतर भेट घडवून आणली. दि. 8 फेब्रुवारी रोजी भारतीय सैन्य दलातील जवान नेहमीप्रमाणे आसाम येथे नाका पॉईंटवर पहारा देत होते. जवानांना या ठिकाणी एक 13 वर्षांची मुलगी घाबरलेल्या अवस्थेत पळताना दिसली. संशय आल्याने तिची अवस्था पाहून  धावत जाऊन जवानांनी तिला रोखले. तिला हिंदी भाषा येत नव्हती. त्यामुळे ती मराठीत बोलायला लागली.

त्याच ठिकाणी चंदगड तालुक्यातील जवान महेंद्र मेहत्तर आपली सेवा बजावत होता. त्या जवानाने मुलीशी संवाद साधला, तेव्हा त्याला मोठा धक्‍काच बसला. संबंधित मुलीने आपण चंदगड तालुक्यातील तेऊरवाडी गावची असून अनोळखी काही मुलींनी मला इथे आणून सोडल्याचे मेहत्तर यांना सांगितले. जवान मेहत्तर यांनी आपल्याच तालुक्यातील मुलगी असल्याचे सहकारी व अधिकार्‍यांशी चर्चा करून अरुणाचल प्रदेश पोलिसांच्या ताब्यात त्या मुलीला देण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबरच चंदगड पोलिसांच्या मदतीने त्या मुलीच्या घरच्यांशीही संपर्क साधला. दरम्यान, मुलीचे वडील भरमू चव्हाण यांनीही आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार कोवाड पोलिसात दाखल केली होती. 

मेहत्तर हा चंदगडचाच असल्याने सुट्टीला येताना आपल्या मुलीला गावी पोहचविण्याची व्यवस्था करेल, असे ठरवण्यात आले. पण पोलिसात तक्रार दाखल असल्याने वरिष्ठ अधिकार्‍यांनी सुरक्षिततेच्या कारणावरुन याला विरोध केला. शेवटी मुलीच्या वडीलानांच आसाम येथे बोलावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पण मुलीचे आर्थिक हलाखीमुळे त्यांच्याकडे प्रवासासाठी पुरेसे पैसेही नव्हते. शेवटी आसाममधून मेहत्तर व इतर सहकार्‍यांनी भरमू यांना काही रक्‍कम पाठवून दिले.

भरमू  4000 कि.मी अंतरावर असणार्‍या आपल्या मुलीला जाऊन भेटला. बाप लेकीची भेट होताच उपस्थित असलेल्या सार्‍यांनाच अश्रू अनावर झाले. ही भेट जवानांनी घडवून आणली.  तेथील कागदोपत्री सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर ईटानगर (नाहरलागून) स्टेशनवर या दोघांना रेल्वेत बसवून गावी पाठवण्यात आले. शुक्रवारी बाप-लेक आपल्या गावी पोहोचणार आहेत.  एकदंरीत गावापासुन चुकून 4000 कि.मी दूरवर गेलेल्या या मुलीची भेट केवळ भारतीय जवानानी घडवून आणल्याने सर्वत्र कौतुक केले जात आहे. 

 

Tags : kolhapur, kolhapur news, Chandgad, soldier, Teurwadi girl, Assam,


  •