Sat, Jul 20, 2019 23:25होमपेज › Kolhapur › 108 कोटींची निविदा मंजुरीसाठी ‘स्थायी’पुढे

108 कोटींची निविदा मंजुरीसाठी ‘स्थायी’पुढे

Published On: Feb 09 2018 2:00AM | Last Updated: Feb 09 2018 1:08AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर शहरातील अंतर्गत जलवाहिन्या बदलण्यासाठी तब्बल 115 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी 108 कोटींची निविदा काढण्याची प्रक्रिया गेले काही दिवस प्रशासकीय पातळीवर सुरू होती. मुंबईतील एका कंपनीची 11.90 टक्के जादा दराची निविदा शुक्रवारी होणार्या स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आली आहे. 

तब्बल 13 कोटी जादा दराची ही निविदा असून ठेकेदाराला काम देण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे; मात्र त्यासाठी मोठ्या आर्थिक उलाढाली झाल्याची चर्चा महापालिका वर्तुळात दिवसभर सुरू होती. दरम्यान, निविदेपेक्षा जादा दरातील 13 कोटी रकमेचा भार महापालिकेच्या तिजोरीवर पडणार आहे.

विद्यमान स्थायी समितीची मुदत संपल्याने गेले दोन दिवस कारभार्‍यांसह प्रशासकीय पातळीवर त्याबाबत जोरदार हालचाली सुरू होत्या. रात्रंदिवस काम करून अखेर पाणीपुरवठा विभागातील अधिकार्‍यांनी काम पूर्ण केले. महापालिकेची कोणतीही निविदा वाटाघाटीशिवाय निघत नसल्याचे सांगण्यात येते. आपल्याच कालावधीत निविदा प्रसिद्ध व्हावी, यासाठी विद्यमान स्थायी समितीतील सदस्यांसह कारभारी तर काही कारभार्‍यांच्या वतीने नव्या समितीच्या कालावधीतच निविदा निघावी यासाठीही व्यूहरचना आखण्यात आली होती. त्यासाठीही रात्रही जागून काढण्यात आली; मात्र विद्यमान नूतन सभापती निवडीच्या पूर्वीच निविदा मंजुरीसाठी आणण्यात काही कारभार्‍यांना यश आले आहे. त्यामागेे कोटीमोलाचा ‘अर्थ’ दडला असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.