Wed, Jul 15, 2020 18:29होमपेज › Kolhapur › विमान सुरक्षेसाठी १३२ अडथळे!

विमान सुरक्षेसाठी १३२ अडथळे!

Published On: Jul 05 2018 1:38AM | Last Updated: Jul 05 2018 1:12AMउजळाईवाडी : दौलत कांबळे

कोल्हापूर विमानतळावर विमान लँडिंग व टेकऑफ करण्यासाठी 20 किलोमीटर परिक्षेत्रातील सुमारे 132 अडथळे आहेत. यातील महत्त्वाचा अडथळा म्हणजे धावपट्टीसमोरील येणारे एमएसईबीचे टॉवर. याबाबत भारतीय विमान पतन प्राधिकरणाकडून जिल्हा प्रशासनाला कळवले आहे. यातील के.आय.टी. कॉलेजचा घुमट तसेच कळंबा ऊर्जा प्रकल्पाचे टॉवरही प्रमुख अडथळे ठरणार आहेत.

20 कि.मी. अंतरातील गावांना घर बांधकाम असो, अथवा उंच टॉवर उभारताना भारतीय विमान पतन प्राधिकरणाची ‘एनओसी’ घेणे बंधनकारक ठरले आहे. विमानतळ सभोवतालच्या ठिकाणी असलेल्या टोलेजंग इमारती, उंच झाडे, के. आय. टी. कॉलेजचा घुमट तसेच वीज वितरण कंपनीचा टॉवर, मोबाईल कंपनीचे टॉवर अडथळे ठरणारे आहेत. या सर्व अडथळ्यांची यादी विमानतळ प्राधिकरणाने तयार केली आहे. यासंदर्भात विमानतळ अधिकार्‍यांकडून जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका यांना कळविण्यात आले आहे. भविष्यात विमान सुरू करण्याच्या द‍ृष्टीने डी. जी. सी. ए. ची परवानगी महत्त्वाची असून, हे अडथळे दूर झाल्याशिवाय मोठी विमाने उतरविण्यास परवानगी मिळणे कठीण आहे. 

कळंबा ऊर्जा प्रकल्पातून गोवा, कर्नाटक तसेच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे खा. धनंजय महाडिक तसेच जिल्हा प्रशासन कोणती भूमिका घेते व विमानतळ प्राधिकरणाचे डीजीसीए विभाग काय निर्णय घेणार, यावरच विमान लँडिंग व टेकऑफ अवलंबून आहे. यासाठी वरिष्ठ पातळीवर याबाबतचा निर्णय होणे गरजेचे आहे. जेणेकरून मुंबईसारख्या ठिकाणी विमानतळाला लागून मोठ्या इमारती आहेत, त्या द‍ृष्टीने कोल्हापूरकडे सकारात्मक द‍ृष्टीने पाहिले तरच याच्यावर मार्ग निघणार आहे. त्याद‍ृष्टीने पावले टाकायला हवीत.