कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी
तमाम फुटबॉल शौकिनांना प्रतीक्षा असणारा सन 2017-18 चा फुटबॉल हंगाम मंगळवार, दि. 19 डिसेंबरपासून सुरू होत आहे. छत्रपती शाहू स्टेडियमवर प्रतिवर्षीप्रमाणे केएसए लिग स्पर्धेने फुटबॉल हंगामास प्रारंभ होणार आहे. वरिष्ठ गटातील सर्व संघ आणि केएसएच्या चर्चेनंतर हंगाम लवकरात-लवकर सुरू व्हावा यासाठी 19 तारखेची निवड करण्यात आली. त्यानुसार मंगळवारी दुपारी 2 वाजता, दिलबहार तालीम ‘ब’ विरुध्द संयुक्त जुना बुधवार सामना होईल. तर सायंकाळी 4 वाजता, स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ विरुध्द संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात होणार आहे.
कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन (केएसए) व सर्व वरिष्ठ संघांच्या पदाधिकार्यांची बैठक शुक्रवारी सायंकाळी छत्रपती शाहू स्टेडियमवर झाली. यंदाच्या हंगामात वरिष्ठ गटात शिवनेरी स्पोर्टस् वगळून 15 संघांनी नोंदणी केली आहे. यात सुपर सीनिअर गटात 8 तर सीनिअर गटात 7 संघ खेळणार आहेत. यामुळे सीनिअर गटातून गुणानुक्रमे एकच संघ कनिष्ठ ‘ब’ गटात जाणार आहे.
दरम्यान, बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. बदललेले नियम, मैदानातील हुल्लडबाजीला आळा घालण्यासाठीची उपाययोजना, कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिस दलाकडून आलेल्या सूचना या विषयावर सविस्तर चर्चा झाली. बैठकीस केएसएचे सचिव माणिक मंडलिक, फुटबॉल सचिव राजेंद्र दळवी, ज्येष्ठ फुटबॉलपटू विश्वंभर मालेकर, नितीन जाधव यांच्यासह वरिष्ठ गटातील संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
ऑनलाईन नोंदणीची अडचण...
एआयएफएफ ने यंदा सर्व फुटबॉल संघांना ऑनलाईन नोंदणीची सक्ती केली आहे. याकरिता 18 डिसेंबरपर्यंतचा कालावधी दिला होता. ही मुदत 22 पर्यंत वाढविण्यात आली आहे. अद्यापही काही संघ व खेळाडूंनी नोंदणी केलेली नाही. तसेच परदेशी खेळाडूंच्या एनओसीसारख्या कागदपत्रांची अडचण आहे. यामुळे नोंदणी न करणार्या खेळाडूंना 18 ते 22 डिसेंबर या कालावधीतील पहिल्या फेरीत खेळता येणार नाही.