Mon, Jul 15, 2019 23:38होमपेज › Kolhapur › फुटबॉल मैदानावर हुल्लडबाजी

फुटबॉल मैदानावर हुल्लडबाजी

Published On: Jan 17 2018 1:57AM | Last Updated: Jan 17 2018 12:21AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

केएसए लीग फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी उत्तरेश्‍वर प्रसादिक तालीम मंडळ विरुद्ध संयुक्‍त जुना बुधवार पेठ तालीम यांच्यातील सामन्यावेळी समर्थकांनी हुल्लडबाजीचा अतिरेक केला. पूर्वार्धात प्रेक्षक गॅलरीतील हाणामारी, सामना जिंकल्यानंतरची अश्‍लील घोषणा थांबविण्याबाबत पोलिस अधिकार्‍यांनी वारंवार सूचना देऊनही त्याला दाद न देता त्यांच्या समोरच बिनधास्त हुल्लडबाजी सुरू होती. मैदानासह रस्त्यांवरही हुल्लडबाजी झाल्याने सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली होती. 

खेळाडूंमुळे गोंधळात वाढ...

सामन्यात उत्तरेश्‍वरने जुना बुधवार पेठेवर मात केली. त्यानंतर उत्तरेश्‍वरच्या खेळाडूंनी प्रेक्षक गॅलरीकडे जात समर्थकांना जल्लोषासाठी इशारा केला. त्यामुळे मैदानात गोंधळ निर्माण झाला. हुल्लडबाजांनी घोषणाबाजी, आरडाओरडा, गोंधळ आणि अश्‍लील भाषेतील घोषणा सुरूच ठेवल्या. जुना राजवाडा व लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांनी मैदानात येऊन माईकवरून समर्थकांना सूचना देऊनही ते शांत झाले नाहीत. हुल्लडबाजीमुळे स्टेडियमशेजारच्या सर्व रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.

केएसएचे सी. सी. टी. व्ही नावापुरतेच

मैदानातील गैरप्रकार रोखण्यासाठी केएसएने सी.सी.टी.व्ही. यंत्रणा लावली आहे. मात्र, त्याआधारे हुल्लडबाजी करणार्‍यांवर कारवाईबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. यामुळे हुल्लडबाज समर्थक या सी.सी.टी.व्ही. समोरच बिनधास्त हुल्लडबाजी करत असतात. यामुळे केएसएचे सी.सी. टी.व्ही. नावापूरतेच असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया फुटबॉलप्रेमींतून व्यक्‍त होत आहेत.