Mon, Jul 22, 2019 03:40होमपेज › Kolhapur › मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार 

मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार 

Published On: May 28 2018 1:42AM | Last Updated: May 27 2018 11:21PMइचलकरंजी : वार्ताहर

इचलकरंजीवासीयांना शुद्ध व मुबलक पाणी मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे वारणेच्या पाण्यावरून निर्माण झालेल्या संघर्षाला पूर्णविराम मिळावा, समन्वयातून तातडीने तोडगा निघावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही दुग्ध व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी दिली. वारणेचा तिढा चर्चेतून नक्‍की सुटेल, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्‍त केला. 
इचलकरंजी शहराला हक्‍काचे वारणेचे पाणी मिळावे, या मागणीसाठी प्रांत कार्यालयासमोर प्रभागनिहाय सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या आजच्या 13 व्या दिवशी प्रभाग क्रमांक 13 मधील नगरसेवक सुनील पाटील व नगरसेविका सौ. संध्या बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली भागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मंत्री जानकर यांनी उपोषणस्थळी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. 

गेल्या बारा दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषण आंदोलनाला शहरातील विविध संघटना, संस्थांच्या पाठिंब्यांचा वाढता ओघ 13 व्या दिवशीही कायम आहे. इचलकरंजी शहराला वारणेचे पाणी मिळावे, या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू आहे. प्रांत कार्यालयासमोर प्रभागनिहाय सुरू असलेल्या या आंदोलनात आज नगरसेवक सुनील पाटील, नगरसेविका सौ.संध्या बनसोडे आदींसह प्रभागातील नागरिकांनी उपोषण केले. विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवत वारणेचे पाणी आणण्याचा निर्धार व्यक्‍त केला. दिवसभर सुरू असलेल्या आंदोलनात नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी, तानाजी पोवार, सागर चाळके, मिश्रीलाल जाजू, दिलीप मुथा, रवींद्र माने, विनय महाजन, हरिष बोहरा आदींसह नागरिकांनी सहभाग घेतला.