Thu, Apr 25, 2019 07:51होमपेज › Kolhapur › खंडपीठासाठी ताकदीने पाठपुरावा करू; डॉ. योगेश जाधव यांची ग्वाही 

खंडपीठासाठी ताकदीने पाठपुरावा करू; डॉ. योगेश जाधव यांची ग्वाही 

Published On: Sep 07 2018 1:04AM | Last Updated: Sep 07 2018 1:04AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या नियुक्‍तीनंतर कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, यासाठी सर्वांना सोबत घेऊन ताकदीने पाठपुरावा करू, अशी ग्वाही दैनिक ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक व उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव यांनी दिली. 

उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गुरुवारी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने डॉ. जाधव यांचा  बारचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

डॉ. जाधव म्हणाले, यापूर्वीही ‘पुढारी’ने खंडपीठ आंदोलनाला बळ दिले आहे. या पदावर नियुक्‍ती झाल्यानंतर कामाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझी चर्चा झाली. या चर्चेतही खंडपीठासाठी आपण अतिशय सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यापूर्वी ‘पुढारी’चे संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली अनेकदा तुम्ही या मागणीसाठी मुंबईला मुख्यमंत्री व इतरांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्रीही याबाबत सकारात्मक आहेत; पण सध्या मुख्य न्यायाधीशांच्या पदावरील नियुक्‍ती झाल्यानंतर सर्वांना सोबत घेऊन सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी हा प्रश्‍न सोडवण्यासाठी पाठपुरावा करेन. 

ते म्हणाले, मी अध्यक्ष असलेल्या मंडळाच्या कामकाजाची पद्धत वेगळी आहे. विकासकामांचा अनुशेष भरून काढणे हे या मंडळाचे मुख्य काम आहे. त्यासाठी संशोधन करून प्रस्ताव तयार करणे व तो राज्यपालांना सादर करणे, हे माझे काम आहे. एकप्रकारे राज्यपालांचा प्रतिनिधीच म्हणून मी काम करणार आहे. मी दिलेला प्रस्ताव राज्यपालांना पटला, तर ते शासनाकडे किंवा विशिष्ट मंत्रालयाकडे पाठवून ते पूर्ण करून घेतील. या मंडळाला फार निधी नाही; पण मंडळाच्या अखत्यारीत नसलेल्या कोल्हापूरच्या 16 प्रश्‍नांची मी यादी तयार केली आहे. हे प्रश्‍न सोडवण्यासाठी आवश्यक तो निधीही मी आणू शकतो. या प्रक्रियेला थोडा वेळ लागेल; पण ही कामे पूर्ण करणार आहे. 

प्रास्ताविकात बारचे अध्यक्ष प्रशांत चिटणीस म्हणाले, बार असोशिएशन व दैनिक ‘पुढारी’चे अतूट नाते आहे. बारच्या प्रत्येक मागणीसाठी मग ती न्याय संकुलाला जागा मिळण्याचा प्रश्‍न असो किंवा कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे ही मागणी, याला नेहमीच ‘पुढारी’ने बळ दिले आहे. खंडपीठासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची ‘पुढारी’ने फक्‍त नोंदच घेतली नाही, तर त्याची शासनदरबारी मुख्यमंत्री आणि अधिकार्‍यांनाही दखल घ्यावी लागली, असा पाठपुरावा  केला. त्यामुळे कोल्हापुरात खंडपीठ झालेच तर त्याचे श्रेय ‘पुढारी’लाच असेल. 

ते म्हणाले, ‘पुढारी’चे संस्थापक संपादक डॉ. ग. गो. जाधव यांनी महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन ‘पुढारी’ची स्थापना केली. आज शंभर वर्षांकडे वाटचाल करणार्‍या ‘पुढारी’ला विद्यमान संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी खर्‍या अर्थाने लोकाभिमुख केले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरही मराठा भाषिकांचे मुखपत्र म्हणून ‘पुढारी’ काम करत आहे. निर्भीडता, सामाजिक प्रश्‍नांच्या मुळाशी जाऊन तो सोडवण्याचा पाठपुरावा, यामुळे ‘पुढारी’ कोल्हापूरकरांच्या रक्‍तात भिनले आहे. आजोबा व वडील यांच्या संस्कारात वाढलेल्या डॉ. योगेश जाधव यांच्या रूपाने एक नवे नेतृत्व ‘पुढारी’ला मिळाले आहे. उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही ते चांगल्या पद्धतीने पार पाडून आपला ठसा उमटवतील. 

माजी अध्यक्ष अ‍ॅड. महादेवराव आडगुळे म्हणाले, डॉ. योगेश जाधव यांना मिळालेले हे पद म्हणजे कोल्हापूरचा बहुमान आहे. डॉ. जाधव हे उत्कृष्ट नेमबाज आहेत. नेमबाजीप्रमाणेच मंडळाच्या अध्यक्षपदाचे काम करताना अनुशेष भरून काढण्यासाठी ते विकासकामांचा अचूक वेध घेतील. त्यांनी आपल्या जबाबदारीबरोबरच महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर करून आणण्यासाठी लक्ष घालावे. आज कोल्हापूरची अवस्था दयनीय झाली आहे. खराब रस्ते, वाहतूक समस्या, पंचगंगा प्रदूषण, असे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. ते सोडवण्यासाठीही त्यांनी लक्ष घालावे. 

अ‍ॅड. विवेक घाटगे म्हणाले, सार्वजनिक प्रश्‍न ऐरणीवर ठेवण्याचे काम ‘पुढारी’ने केले. ‘पुढारी’ने एखादा प्रश्‍न लावून धरला, तर तो लवकर सुटतो. न्यायाधीश होण्यासाठी कायद्याच्या पदवीनंतरची प्रॅक्टिसची अट रद्द केली आहे. त्यामुळे अनेक प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता असून, यावर ‘पुढारी’ने आवाज उठवावा. 

यावेळी अ‍ॅड. रणजित तावडे यांचेही भाषण झाले. कार्यक्रमात राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल सहायक फौजदार दत्ता मासाळ व कॉन्स्टेबल वसंत पन्हाळकर यांचा डॉ. जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. क्रिमिनल बार असोसिएशनच्या वतीने अ‍ॅड. डी. डी. देसाई यांनी डॉ. जाधव यांचा सत्कार केला.  सूत्रसंचालन अ‍ॅड. सुशांत गुडाळकर यांनी केले. आभार उपाध्यक्ष अ‍ॅड. ए. बी. जाधव यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. व्ही. व्ही. शुक्‍ल, माजी अध्यक्ष अ‍ॅड. शिवाजीराव राणे, अ‍ॅड. सुभाष पिसाळ यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.