Tue, Apr 23, 2019 23:54होमपेज › Kolhapur › छोट्या गोष्टी पाळा, मोठा धोका टाळा!

छोट्या गोष्टी पाळा, मोठा धोका टाळा!

Published On: Jun 06 2018 1:42AM | Last Updated: Jun 05 2018 11:54PMकोल्हापूर : सचिन पाटील 

घरगुती गॅस वापरत असताना अचानक एखादी दुर्घटना घडते. त्यावेळी यासंदर्भातील सुरक्षितता किती महत्त्वाची असते, याची जाणीव होते. शिरोली येथे काही दिवसांपूर्वी सिलिंडरचा स्फोट झाला होता. अशा लहान-मोठ्या दुर्घटना आपण बर्‍याचदा पाहत असतो. तज्ज्ञांच्या मतानुसार पुढील काही साध्या टिप्स लक्षात ठेवल्या तर गॅसचा वापर सुलभ होऊ शकतो. 

सिलिंडर घरी आल्यानंतर सुरक्षा कॅप, सील व सिलिंडरची स्थिती योग्य आहे का हे पहावे. 

गॅस सिलिंडर नेहमी हवेशीर जागेतच ठेवावा. जेणेकरून लिक झाल्यास गॅस बाहेर पडण्यास मदत होईल. आग लागण्याचा धोका कमी होईल. 

सिलिंडरला जोडलेली पाईप चांगल्या दर्जाचीच व आयएसओ सारख्या नामांकनाची असावी. त्यावर त्याची एक्सपायरी डेट असते. त्यानुसार त्यावेळी ती बदलावी. 

हिरव्या रंगाची हल्की पाईप वापरू नये. अलीकडे काही वर्षांत केशरी रंगाची जाड पाईप चांगल्या दर्जाची उपलब्ध झाली आहे.

गॅस लिक झाल्यास ताबडतोब घराच्या खिडक्या, दारे उघडावीत.  विजेची उपकरणे बंद करावीत. मेणबत्ती, अगरबत्ती देखील पेटवू नये. सिलिंडरला सुरक्षा कॅप लावून तो खुल्या जागेवर ठेवावा. 

सिलिंडर अधिकृत डिलरकडूनच खरेदी करावा. अवैधरीत्या खरेदी केलेला सिलिंडरला सुरक्षेबाबत कोणतीही हमी नसते. त्यामुळे असे सिलिंडर खरेदी करणे म्हणजे अपघाताला निमंत्रणच देण्यासारखे असते. 

सिलिंडर नेहमी जमिनीवर उभ्या अवस्थेतच ठेवावा. रात्री रेग्युलेटर बंद करावा. 

सिलिंडर टाकी असलेल्या ठिकाणी ज्वालाग्रही पदार्थ ठेऊ नयेत. शिवाय गॅस शेगडीजवळ पडदे देखील असू नयेत. 

शेगडी स्वच्छ करत असताना पाईपवर ताण येणार नाही,याची काळजी घेणे आवश्यक आहे. स्वच्छतेसाठी शेगडी सारखी उचल्याने जोडलेली पाईप तुटू शकते. पाईप जोडलेला लोखंडी नॉबलाही तडा जाऊन स्फोट होण्याची शक्यता असते. 

सुरक्षेच्या द‍ृष्टीने काही कंपन्यांची सिलिंडरला जोडण्यात येणारी उपकरणे उपलब्ध आहेत. ती देखील तज्ज्ञ व्यक्‍तींच्या सल्ल्याने आपण वापरू शकतो.