Wed, Jul 17, 2019 00:04होमपेज › Kolhapur › पर्यायी पुलासाठी पोलिसांचाही पाठपुरावा 

पर्यायी पुलासाठी पोलिसांचाही पाठपुरावा 

Published On: May 03 2018 1:41AM | Last Updated: May 03 2018 12:53AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पंचगंगेवरील शिवाजी पुलावर झालेल्या अपघातास जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई कधी करणार असा सवाल बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांना बुधवारी करण्यात आला. गुन्हे दाखल करून पर्यायी पुलाचे काम सुरू होणार का, अशी विचारणा करत या पुलाचे बांधकाम पूर्ण व्हावे याकरिता पोलिस प्रशासनाचाही पाठपुरावा सुरू असल्याचे मोहिते यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

पर्यायी पुलाचे बांधकाम रखडले आहे. हे बांधकाम आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत पूर्ण करावे आणि जीवित व वित्त हानी टाळावी, अन्यथा संबंधित अधिकार्‍यांना दोषी धरले जाईल, असे निवेदन समितीच्या वतीने दि.20 जानेवारी रोजी दिले होते. यानंतर दि. 26 रोजी या पुलावर झालेल्या भीषण अपघातात 13 जणांचा बळी गेला होता. नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यास जाणीवपूर्वक विलंब लावल्याबद्दल संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी समितीने केली होती. त्यावर याप्रकरणी पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. याप्रकरणी काय चौकशी झाली, याची विचारणा समितीने केली.

मोहिते म्हणाले, पर्यायी पुलाचे बांधकाम पूर्ण होणे पोलिस प्रशासनाच्या द‍ृष्टीने महत्त्वाचे आहे. शिवाजी पुलाला पर्याय नाही. यामुळे वाहतुकीचे नियोजन करताना दमछाक करावी लागत आहे. अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने सध्या वळवली आहे. मात्र, या रस्त्यांवर पडणार्‍या ताणामुळे येत्या पावसाळ्यात हा रस्ता खराब होऊन चालण्यायोग्यही राहणार नाही अशी परिस्थिती आहे. यामुळे पोलिस प्रशासनाच्या वतीने या पुलाच्या बांधकामासाठी पत्रव्यवहार सुरू आहेत. विविध प्रकारची माहिती संकलित करून त्याद्वारे पुरातत्त्व विभागाशी संपर्क साधला जात आहे. यामुळे लवकरच पुलाच्या अर्धवट बांधकामाचे काम सुरू होईल. 

यावेळी समितीचे किसन कल्याणकर, रामेश्‍वर पतकी, श्रीधर कुलकर्णी, योगेश शेटे, चिन्मय सासणे, दादासाहेब माने, प्रशांत बरगे, राहुल चौधरी, सुमित खानोलकर, तौफिक शेख, दिलीप परीट, गुरुदत्त म्हाडगुत आदी उपस्थित होते.