Sat, Aug 17, 2019 16:14होमपेज › Kolhapur › लोककलाकार मानधनाच्या प्रतीक्षेत

लोककलाकार मानधनाच्या प्रतीक्षेत

Published On: Jan 20 2018 1:39AM | Last Updated: Jan 20 2018 12:53AMबिद्री : प्रतिनिधी 

कोल्हापूर जिल्ह्यातील वृद्ध  लोककलाकार गेले अठरा महिने मानधनापासून वंचित असून मानधन कधी मिळणार? या प्रतीक्षेत  आहेत. मानधन त्वरित मिळावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा लोककलाकार संघटनेचे रामचंद्र चौगले (कुडुत्रीकर) यांनी दिला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात वृद्ध साहित्यिक व कलाकारांना मानधन योजना चालू झाल्यापासून आतापर्यंत एकूण 1400 कलाकार मानधन घेत आहेत. शासनाने सुरुवातीस मासिक 500 रुपये पासून मानधनास सुरुवात केली. आता कलाकार वर्गवारीत ‘क’ वर्गासाठी 1500 रुपये, ‘ब’ वर्गासाठी 1800 आणी ‘अ’ वर्गासाठी 2100 रुपये मानधन देण्यात येत आहे.

ऑगस्ट 2017 ते आतापर्यंत 1509 पैकी निम्या कलाकारांना मानधन अद्याप मिळालेले नाही. शासनाने कलाकारांना थेट खात्यावर व लवकर मानधन मिळावे, यासाठी भाजप-शिवसेना सरकारने ऑनलाईन कलाकार मानधन योजना अंमलात आणली; पण ही योजना ही किचकट अटींमुळे कलाकारांना मानधनापासून वंचित ठेवण्याची ठरली आहे. जिल्हा प्रशासनाकडे किती कलाकार  ऑनलाईन करावयाचे आहेत याची साधी नोंदही नाही.  या विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी प्रत्येक पंचायत समिती विभागाकडे व ग्रामपंचायतीकडून  कलाकार फॉर्म अतितातडीचे भरून द्यावेत, असे आदेश देण्यात आलेत; पण ग्रामपंचायतीच्या काही ग्रामसेवकांनी लवकर भरून दिलेत तर काही ग्रामसेवकांना या योजनेची माहिती नाही.  जे अर्ज उपलब्ध झालेत ते शासनाकडे पाठवून मानधनची ऑनलाईन प्रक्रिया  तत्काळ पूर्ण करावी, अशी मागणी केली आहे.