होमपेज › Kolhapur › सकाळी धुके; दिवसभर उष्मा

सकाळी धुके; दिवसभर उष्मा

Published On: Mar 06 2018 12:38AM | Last Updated: Mar 05 2018 11:54PMकोल्हापूर : प्रतिनिधी

गेली दोन-तीन दिवस सकाळपासूनच अंगाची लाही करणार्‍या सूर्याचे सोमवारी मात्र, सकाळी नऊ नंतर दर्शन झाले. पहाटे पासून शहर आणि परिसरात दाट धुके पडले होते. धुके विरळ झाल्यानंतर उन्हाचा तडाखा पुन्हा वाढला. सकाळी धुके आणि दिवसभर उष्मा अशा विचित्र हवामानाची अनुभूती शहरवासीयांनी घेतली.

थंडी गायब झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. वाढत्या उन्हाच्या झळ्यांनी नागरिक आतापासूनच हैराण होऊ लागले आहेत. जिल्ह्याचा पारा 35 अंशांवर गेल्याने हवेतील उकाडा अधिक जाणवू लागला आहे. सकाळी सात-आठ वाजल्यापासूनच सूर्याच्या प्रखर किरणांनी वातावरणात उष्मा जाणवत असताना आज पहाटे शहर आणि परिसरात धुक्याची दुलई पसरली. दाट धुके पडले तरी म्हणावी तशी थंडी जाणवत नव्हती.

पहाटेपासून पडलेल्या धुक्याची सहानंतर तीव्रता अधिक वाढली. दाट धुक्यामुळे वाहनधारकांना दिवा लावूनच वाहने चालवावी लागत होती. काही काळ धुक्याची तीव्रता इतकी वाढली की काही अंतरावरीलही दिवस नव्हते. सकाळी नऊपर्यंत धुके होते. त्यानंतर ते विरळ होत गेले. शहर आणि परिसरात तर सकाळी नऊ नंतरच सूर्याचे दर्शन झाले. दहा वाजल्यापासून उन्हाची तीव्रता वाढू लागली. दुपारी हवेत उकाडा अधिक जाणवत होता. आज शहरात 35.2 सेल्सियस इतके तापमान नोंदवण्यात आले. येत्या काही दिवसांत तापमान स्थिर राहील, असा हवामान विभागाचा अंदाज असल्याने यंदाचा उन्हाळा असहय्य ठरण्याचीच शक्यता अधिक आहे.