Mon, Nov 19, 2018 18:58होमपेज › Kolhapur › ‘जीआयएस-एमआयएस’ तंत्राने जिल्ह्यात पूर नियंत्रण

‘जीआयएस-एमआयएस’ तंत्राने जिल्ह्यात पूर नियंत्रण

Published On: Aug 29 2018 1:52AM | Last Updated: Aug 29 2018 1:49AMकोल्हापूर : अनिल देशमुख

जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी ‘जीआयएस आणि एमआयएस’ तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. अमेरिकेतील प्रुडो विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठातील भूगोल विभागाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला हा प्रकल्प दिला जाणार आहे. या तंत्रज्ञानाद्वारे पूर नियंत्रण केल्यास भविष्यात मोठी जीवित व वित्त हानी टाळता येईल, असा विश्‍वास जिल्हा प्रशासनाला आहे.

राज्यात सर्वाधिक पाऊस पडणार्‍या जिल्ह्यांपैकी कोल्हापूर एक आहे. जिल्ह्यात धरणे आणि नद्यांचे जाळे मोठे आहे. पश्‍चिम घाटातील महत्त्वाच्या असलेल्या या जिल्ह्यात पूरस्थिती अनेकदा गंभीर होत असते. कोकण, गोवा, कर्नाटकातील काही गावांशी  जिल्हामार्गे होणारा संपर्कही अनेकदा तुटतो. जिल्ह्यातील दळणवळणावरही मोठा परिणाम होतो. जीवित व वित्त हानीही पुरामुळे झाल्याचे प्रकार घडले आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने राज्यात आपत्ती व्यवस्थापनाचे ‘रोल मॉडेल’ विकसित केले आहे. त्यात आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जिल्ह्याचे ‘फ्लड मॅनेजमेंट’ अधिक प्रभावी करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे.

मूळचे कोल्हापूरचे असलेले आणि प्रुडो विद्यापीठात पूरस्थितीवर संशोधन करणारे, अमेरिका फ्लड मॅनेजमेंटमधील महत्त्वाचे घटक असलेले डॉ. व्यंकटेश मेरवाडे आणि शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल विभागाचे डॉ. सचिन पन्हाळकर यांच्या मदतीने जिल्ह्यासाठी पूर नियंत्रण प्रकल्प तयार करण्यात येणार आहे. याकरिता आवश्यक माहिती जिल्हा प्रशासनाने संबंधितांना उपलब्ध करून दिली आहे. उपलब्ध माहिती आणि जिल्ह्याचा नकाशा यावर आधारित ‘फ्लड मॅनेजमेंट’ सिस्टिम विकसित करण्यात येणार आहे. ‘जीआयएस’ म्हणजे भौगोलिक माहिती आणि ‘एमआयएस’ म्हणजे व्यवस्थापन माहिती यांची सांगड घातली जाणार आहे.

या नव्या प्रकल्पात आवश्यक माहिती नकाशासह उपलब्ध होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील पूरस्थितीचे वास्तव चित्र प्रत्येकवेळी स्पष्ट होणार आहे. आपत्कालीन परिस्थितीची सद्यस्थिती, त्याची व्याप्‍ती नकाशावर स्पष्ट होणार आहे. यामुळे रस्ते, पूल, गावे कधी बाधित होऊ शकतील, याची माहिती आगाऊ मिळणे शक्य होईल. त्याद‍ृष्टीने आपत्ती व्यवस्थापन करणे शक्य होणार आहे. 

जिल्ह्यातील पूरस्थिती
प्रमुख नद्या    12
पूरबाधित गावे     129
पूरबाधित शहरे    3