Mon, Jul 15, 2019 23:42



होमपेज › Kolhapur › पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम

Published On: Jul 19 2018 1:37AM | Last Updated: Jul 18 2018 11:41PM



कोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील धरण क्षेत्रासह शहर व परिसरात गेल्या चार दिवसांतील अतिवृष्टीमुळे पंचगंगा नदीला महापूर आला आहे. नदीत मिसळणार्‍या नाल्यांच्या परिसरात पाणी साठल्याने कोल्हापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडल्याची स्थिती आहे. अनेक ठिकाणी घरांत पाणी घुसले असल्याने 14 कुटुंबांतील 64 जणांचे स्थलांतर करण्यात आले आहे. गंगावेस ते छत्रपती शिवाजी पुलासह इतर काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. महापौर सौ. शोभा बोंद्रे व आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांनी बुधवारी शहरात संयुक्‍तफिरती करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला.

पंचगंगेला महापूर आल्याने नदी पात्रात सर्वत्र पाणी पसरले आहे. शहरात पंचगंगा तालमीपर्यंत पुराचे पाणी आले आहे. त्याबरोबरच जयंती नाल्यातील सांडपाणी मागे पसरून ते व्हीनस कॉर्नरपर्यंत पसरले आहे. शाहूपुरी कुंभार गल्लीतील घरातही पाणी घुसले. त्याबरोबरच शास्त्रीनगर, जवाहरनगर आदी भागांसह इतरत्र नाल्यातील सांडपाणी पसरले आहे. शहराच्या पूर्वेला तावडे हॉटेल ते शिरोली जकात नाक्यापर्यंतचा सर्व भाग पुराच्या पाण्याने वेढला गेला आहे. सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे.  

सुतारवाडा परिसरात पुराचे पाणी आल्याने तेथील 14 कुटुंबांतील 64 नागरिकांना दसरा चौकातील चित्रदुर्ग मठ (37 नागरिक), मुस्लिम बोर्डिंग (27 नागरिक) व लक्षतीर्थ वसाहत येथील एक कुटुंब रानडे विद्यालय (3 नागरिक) येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. काटेमळा येथील 4 कुटुंबे पाहुण्यांकडे राहायला गेलेली आहेत. तसेच पाण्याची पातळी सतत वाढत असल्याने उर्वरित नागरिकांनाही स्थलांतरित होण्याबाबत सूचना केलेली आहे. 

शहरात सखल भागात पुराचे पाणी आल्याने पूरस्थितीची पाहणी महापौर बोंद्रे व आयुक्‍तचौधरी यांनी पदाधिकारी व अधिकारी यांच्या समवेत केली. मुसळधार पावसाने पंचगंगा पातळीत सातत्याने वाढ होत असून, राजाराम बंधारा येथे पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे महापालिकेच्या सर्व अधिकार्‍यांनी सतर्क राहावे, अशा सूचना महापौर बोंद्रे यांनी दिल्या. 

पूरबाधित क्षेत्रातून स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांसाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था कराव्यात. तेथे लाईट, पाण्याची व्यवस्था निटनेटकी व आरोग्य विभागाची पथके कार्यरत ठेवण्याचे आदेश महापौरांनी दिले. तसेच पूर आलेल्या भागात औषध फवारणीही करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी पंचगंगा नदीवरील छत्रपती शिवाजी पूल, सुतारवाडा, नागाळा पार्कातील राजहंस प्रिंटिंग प्रेस या ठिकाणी पूरस्थितीची पाहणी केली. यावेळी चित्रदुर्ग मठ येथे स्थंलातरित करण्यात आलेल्या नागरिकांची भेट घेऊन चौकशी केली. 

आपत्कालीन स्थितीच्या मुकाबल्यासाठी महापालिका इमारतीमधील अग्निशमन विभागात मुख्य आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, त्याचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक 101 असा आहे. तसेच आरोग्य विभागाच्या आपत्ती काळातील तक्रारी संदर्भात दूरध्वनी क्रमांक 2540290 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत चार विभागीय कार्यालयांमध्ये दक्षता पथके 24 तास कार्यरत ठेवण्यात आलेली आहेत. 

यावेळी उपमहापौर महेश सावंत, काँग्रेस गटनेता शारंगधर देशमुख, परिवहन समिती सभापती राहुल चव्हाण, महिला व बालकल्याण समिती सभापती सुरेखा शहा, प्राथमिक शिक्षण समिती सभापती अशोक जाधव, विरोधी पक्षनेता विलास वास्कर, नगरसेविका शोभा कवाळे, माधवी गवंडी, विरोधी पक्षनेता विलास वास्कर, निलोफर आजेकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, लक्ष्मीपुरी ठाण्याचेे पोलिस निरीक्षक वसंतराव बाबर, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ.विजय पाटील आदी उपस्थित होते.