Fri, Apr 26, 2019 01:23होमपेज › Kolhapur › कोल्हापूर-मुंबई विमान सेवा आजपासून

कोल्हापूर-मुंबई विमान सेवा आजपासून

Published On: Apr 17 2018 1:53AM | Last Updated: Apr 17 2018 1:53AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर-मुंबई विमान सेवेला मंगळवार (दि. 17) पासून प्रारंभ होत आहे. दुपारी तीन वाजता विमान कोल्हापूरच्या विमानतळावरून आकाशात झेपावणार आहे. मुंबईकडे जाणारी ही पहिली फ्लाईट फुल्ल झाली असून, पुढच्या फेर्‍यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.केंद्र शासनाच्या ‘उडान’ योजनेंतर्गत एअर डेक्‍कन कंपनीने कोल्हापूर-मुंबई मार्गावर विमान सेवा सुरू केली आहे. आठवड्यातून तीन दिवस सुरू राहणारी ही विमान सेवा आठवड्यातून किमान 5 दिवस असावी आणि मिळालेला टाईम स्लॉट (वेळ) बदलून मिळावा, असा आग्रह कंपनीने धरल्याने सेवा सुरू करण्यास विलंब लागला. केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री म्हणून सूत्रे घेतल्यानंतर सुरेश प्रभू यांनी कंपनीला तातडीने विमान सेवा सुरू करण्याचे पत्र दिले होते. 

या सर्व पार्श्‍वभूमीवर कंपनीने दि. 22 एप्रिलपासून विमान सेवा सुरू करत असल्याचे घोषित केले. त्याकरिता दि. 8, दि. 15, दि. 17 व दि. 18 अशी ट्रायल रन घेतली जाईल असे स्पष्ट करत दि. 8 व दि. 15 रोजी ट्रायल रन (चाचणी) घेतली. मात्र, विमान सेवेला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे कंपनीने दि. 22 पूर्वी पाच दिवस आधीच विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि अवघ्या दिवसभरात दि. 17 व दि. 18 रोजीच्या दोन्ही फ्लाईट फुल्ल झाल्या.

मंगळवारी मुंबईहून दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी विमान कोल्हापूरसाठी टेक ऑफ करणार असून, दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी ते कोल्हापूर विमानतळावर उतरणार आहे. यानंतर दुपारी 3 वाजून 5 मिनिटांनी ते मुंबईकडे झेपावणार असून, दुपारी 4 वाजून 15 मिनिटांनी ते मुंबई विमानतळावर लँडिंग करणार आहे. या पहिल्या विमानाने खा. धनंजय महाडिक मुंबईला जाणार आहेत. त्यांच्या सोबत अंध, अपंग, निराधार महिला, कचरा वेचक महिला, शेतकरी दाम्पत्य अशा प्रवाशांना संधी मिळणार आहे.

1,940 रुपयांत ‘उडान’
कोल्हापूर-मुंबई या मार्गासाठी ‘उडान’ योजनेंतर्गत पहिल्या 9 सीटस्साठी 1,940 रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. प्रत्यक्ष तिकीट बुकिंग करताना कंपनीच्या विविध ऑफर्समुळे हे भाडे आणखी दोनशे ते तीनशे रुपयांनी कमी होणार आहे. यामुळे रेल्वेच्या फर्स्ट क्‍लासच्या तिकीट दरापेक्षाही कमी दरात विमान सेवेचा लाभ मिळणार आहे. उर्वरित 9 तिकिटांसाठी 3,700 पासून पुढे भाडे आकारले जाणार आहे. कंपनीच्या बेवसाईटवर तिकिटाचे बुकिंग करता येणार आहे..

अशी असेल विमान सेवा... 

18 सीटर विमान; पहिल्या 9 सीटस् ‘उडान’ योजनेच्या

दर रविवार, मंगळवार आणि बुधवारी फेरी

मुंबई टेक ऑफ : दु.1.15 वा. कोल्हापूर लँडिंग :  दु. 2.45 वा.

कोल्हापूर टेक ऑफ :  दु. 3.05 वा. मुंबई लँडिंग : दु. 4.15 वा.


विकासाला चालना मिळणार

कोल्हापूर-मुंबई मार्गावरील प्रवासी विमान सेवा गेल्या साडेसात वर्षांपासून बंद होती. ही विमान सेवा सुरू होण्यासाठी सातत्याने लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न केले जात होते. प्रत्येक पातळीवर पाठपुरावा सुरू होता. आता केंद्र शासनाच्या ‘उडान’ योजनेंतर्गत ही सेवा सुरू होत असून, ही सेवा नियमित सुरू राहिल्यास कोल्हापूर आणि परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. 

Tags : Kolhapur, Kolhapur, Mumbai,  Flights, today